आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेकबुद्धीने नुकसानीचे पंचनामे करा; तहसीलदार विजय राऊत यांच्या सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- गारपिटीमुळे होणार्‍या पिकांचे पंचनामे अन् पुन्हा पडणारा पाऊस या निसर्गाच्या लहरीपणामुळे महसूल विभाग हतबल झाला आहे. त्यामुळे यापुढे सद्सद्विवेकबुद्धीने नुकसानीचे पंचनामे करा, अशा सूचना तहसीलदार विजय राऊत यांनी कर्मचारी, अधिकार्‍यांना दिल्या.

जिल्ह्यासह औरंगाबाद तालुक्यात 3 मार्चपासून गारपिटीसह रोजच पाऊस पडत आहे. बुधवारपर्यंत तालुक्यात सरासरी 14 मि.मी पाऊस पडल्याची नोंद होती. हा पाऊस सर्वत्र सारखा पडत नसून कमी जास्त प्रमाणात पडत आहे. औरंगाबाद तालुक्यात रब्बी पिकाचे 29 हजार 400 हेक्टर क्षेत्र आहे. 8 मार्चपूर्वी स्थळपाहणी करून 35 टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. परंतु पुन्हा 8 ते 9 मार्च रोजी तालुक्यात वादळ-वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांबरोबर फळबागांचेही नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा 12 ते 14 मार्चदरम्यान शेतकर्‍यांचे वैयक्तिक पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांना देण्यात आले. बुधवारी पंचनामे पूर्ण होताच पुन्हा पावसाने औरंगाबाद तालुक्याला झोडपून काढले.

या अवकाळी पावसामुळे लाडसावंगी परिसरातील शेडनेट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या शेडनेटची पाहणी कोंडे यांनी केली, तर करमाड येथील परिसरात रात्री 11.30 च्या सुमारास झालेल्या पावसात दादाराव कुलकर्णी यांच्या चार बकर्‍या मृत्युमुखी पडल्या. दत्तू तारव यांचे छप्पर कोसळल्याने चार जनावरांना दुखापत झाली. यात दत्तू तारव हेदेखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. करमाड परिसरात तलाठी सुभाष वाघ, कृषी मदतनीस एस.आर. थोरात व ग्रामविकास अधिकारी ए.आर. गायकवाड यांनी बुधवारी पडलेल्या पावसामुळे दुसर्‍यांदा नुकसानीचे पंचनामे केले आहेत. हे सर्व पंचनामे उद्या सायंकाळपर्यंत शासनाकडे सादर करावयाचे आहेत.

70 लाखांचे नुकसान
लाडसावंगी परिसरात रात्री 7.30 वाजता पाऊ स पडण्यास सुरुवात झाली. यात औरंगपूर गावातील 22 शेडनेट जमीनदोस्त झाले. तसेच डाळिंबाच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. एक शेडनेट बांधण्यासाठी किमान 3 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.