आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारा विरघळल्या, जखमा भळभळत्याच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठाण मांडवा (जि. बीड) - अंबाजोगाईच्या पठाण मांडवा या गावावर 8 मार्चला आभाळाने हल्लाच चढवला. बेफाम गारपीट झाली, नंतरही पाऊस वेड्यासारखा कोसळत राहिला. गारा विरघळल्या, पण त्यांनी एका कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त केले. 22 वर्षांच्या महादेव शेळकेने निराश होत जीवनयात्रा संपवली, पण आता त्याचे कुटुंब अपार वेदनांचे ओझे घेत जगत आहेत. त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत हरवलेली स्वप्ने आहेत, तर भावंडांच्या मनात आठवणींचे तांडव.

अंबाजोगाईपासून 12 किमी अंतरावरचे पठाण मांडवा गाव म्हटले तर तालुक्यापासून जवळ, पण तेवढेच दुर्गम. चारही बाजूंनी डोंगर आणि त्यांच्या पायथ्याशी हे 4 हजार लोकवस्तीचे गाव. गावातील बहुतेक शेतकरी अल्प भूधारक. या गावाने 3 मार्चपासून निसर्गाचे विकृत स्वरूप पाहिले. 3 मार्चला पहिली गारपीट झाली आणि पाऊसही आला. पाऊस तर 15 दिवस सुरूच होता. 8 मार्चला गारांनी या गावाला झोडपून काढले. लिंबाएवढ्या गारांनी परिसरातील शेतीची एवढी नासधूस केली की दुसर्‍या दिवशी पाहण्यासारखेही काहीच उरले नव्हते. चोहीकडे फक्त बरबादीचे अवशेष. कुटुंबाची पाच एकर शेती पाहणार्‍या महादेव शेळकेला 8 तारखेपासून अस्वस्थता छळत होती. पावसाची धार सुरूच होती. अस्वस्थता असह्य झाली आणि 14 मार्च रोजी त्याने राहत्या घरात आत्महत्या केली.

याच शेळके कुटुंबाची भेट घेतली तेव्हा सगळ्या गोष्टी समोर आल्या. निसर्गाचा आघात, दानशूरांचे मदतीचे हात आणि प्रशासनाचे नाकर्तेपण समोर आले. गावात दोन खोल्यांचे प्लास्टर नसलेले शेळकेंचे घर आहे. एक स्वयंपाकघर आणि दुसरी सर्वांची खोली. या दुसर्‍या खोलीतच महादेवने आत्महत्या केली होती. तिथेच एका सीएफएलच्या केविलवाण्या उजेडात शेळके कुटुंब बसले होते. आजी लिंबाबाई, आजोबा शिवाजीराव, आई संजीवनी, वडील अशोक, भाऊ खंडू आणि बहीण सारिका हे महादेवचे कुटुंबीय आजही त्याच्या आठवणींत हरवलेले आहेत.

हरवलेली स्वप्ने....
महादेवच्या वडिलांची तर अशी अवस्था की, सरकारकडून काय मदत अपेक्षित आहे या प्रश्नावर त्यांनी खालचा ओठ दाताखाली धरत मनातल्या भावना दाबून धरल्या. हताश नजरेने सरपंच शाहू बिडवे यांच्याकडे पाहत कसेबसे नियंत्रण मिळवले. आजी लिंबाबाई महादेवबद्दल बोलताना मध्येच त्यांचा कंठ दाटून येत होता. दु:खाचे कढ दाबत महादेवची आई संजीवनी शांत बसून होती, तर भावाच्या चेहर्‍यावर कसलेही भाव नाहीत. प्रत्येक जण त्या पावसाचे वर्णन करत होता. एवढी गारपीट 40 वर्षांत झाली नाही, हे सांगताना त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या पाच एकरातला झोपलेला गहू आणि हरभरा दिसत होता.

मला नोकरी करायची
महादेवची धाकटी बहीण सारिका दहावीची परीक्षा देत आहे. 14 मार्चला महादेवने आत्महत्या केली. 16 तारखेला तिचा पेपर होता. भावाच्या आत्महत्येचे दु:ख एवढे होते की डोळ्यातून सतत पाण्याची धार. सर्वांनी तिला कशीबशी परीक्षेला जाण्यास तयार केले आणि तिने नंतरचे पेपर दिले. गावातल्याच परीक्षा केंद्रावर सर्वांना तिची अवस्था माहीत होती. प्रत्येकाने खासकरून शिक्षकांनी तिला जमेल तसे लिही, असे सांगत धीर दिला. हे सांगतानाही सारिकाला खूप त्रास होत होता. पुढे शिकणार का, या प्रश्नावर मान डोलवत सारिकाने होकार दिला. काय शिकायचे, काय व्हायचेय? या प्रश्नावर मात्र तिने बारावी करायची आणि नोकरी करायची, असे सांगत आपले ध्येय सांगितले. दुसरीकडे, मानवलोक या संस्थेने तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली आहे. सरपंच बिडवे हे शिक्षकही आहेत. ते म्हणाले की, तिला पुढे शिकायला तयार करावे लागणार आहे.

प्रशासन उदासीन
सरपंच बिडवे म्हणाले की, परिस्थिती भयंकर आहे, हे प्रशासनाला सांगूनही कुणीच दखल घेतली नाही. 14 ते 18 मार्चपर्यंत कोणीच आले नाही. 18 तारखेला मंडळ अधिकारी, तलाठी येऊन गेले. नंतर पंचनामे झाले, तेही अर्धवट. दीड दिवसात सगळा गाव उरकला त्यांनी. अर्धा फूट गारांचा थर शेतात साचला होता. सगळे साफ झाले. टोमॅटोच्या बागा साफ झाल्या, गहू खराब झाला. हरभर्‍याची नासाडी झाली. काही म्हणता काही उरले नाही. सरकार पुन्हा नुकसानीसाठी 50 टक्क्यांच्या निकषात अडकले आहे, असे ते म्हणाले. सरकारची मदत होईल तेव्हा होईल, पण मानवलोक या संस्थेने धाव घेत शेळके कुटुंबाला तातडीने 5 हजार रुपयांची मदत दिली आणि सारिकाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

डोक्यावर कर्ज
पाच एकर जमीन असणार्‍या शेळके कुटुंबाची अवस्था यथातथाच आहे. महादेवसह कुटुंबात सात सदस्य. पाच एकरांपैकी एका एकरात गहू होता, तर एका एकरात हरभरा. गारपिटीत सारेच झोपले. जिल्हा बँकेचे 25 हजार रुपयांचे कर्ज शेळके कुटुंबावर होते. डोळ्यासमोर पीक गेले, डोक्यावर कर्जाचे ओझे हे असह्य झाले अन् महादेवने आत्महत्या केली.

मदतीचे आवाहन
शेळके कुटुंबाची अवस्था पाहता त्यांना प्रशासनानेच नव्हे, तर सर्वांनी मदतीचा हात देऊन उभे करण्याची गरज आहे. सारिकाच्या शिक्षणासाठी खर्च लागणार आहे. ‘दिव्य मराठी’च्या वाचकांना या कुटुंबाला मदत करायची असेल, तर अशोक शेळके व संजीवनी शेळके यांच्या बँक ऑफ बडोदामधील संयुक्त खात्यावर मदत जमा करावी. त्यांचा खाते क्रमांक 09880100016645 आहे.