आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोपडपट्ट्यांचे निर्मूलन; उस्मानाबाद शहरात दहा झोपडपट्ट्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - केंद्र शासनाच्या राजीव आवास योजनेंतर्गत शहरातील झोपडपट्टी भागाचा सामाजिक आणि आर्थिक सर्व्हे करण्यात येत आहे. आगामी काळात शहरातील झोपडपट्टी निर्मूलन करण्यात येणार आहे. त्यानुसार 10 झोपडपट्ट्यांमध्ये पक्की घरे बांधून देण्यासह मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

बेघर व्यक्तींना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी यापूर्वी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना रावबण्यात आल्या. तरीही शहराच्या ठिकाणी झोपडपट्ट्यांची समस्या कायम आहे. त्यामुळे केंद्र शासनाने झोपडपट्टी निर्मूलन करण्यासाठी राजीव गांधी आवास योजना सुरू केलेली आहे. त्याअंतर्गत उस्मानाबाद शहरातीलही झोपडपट्ट्यांचे निर्मूलन करण्यात येणार आहे. झोपडपट्टी निर्मूलन करण्यासह या भागात राहणार्‍या नागरिकांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार उस्मानाबादमध्ये असलेल्या 10 झोपडपट्टी भागाचे सामाजिक आणि आर्थिक सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. शहरातील वडार गल्ली, इंदिरा गांधी नगर, आगड गल्ली, सांजावेस, झोरी गल्ली या ठिकाणचा सर्व्हे करण्यात आला आहे. तर खॉजानगर आणि भीमनगर येथील सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण भागाचा सर्व्हे झाल्यानंतर या ठिकाणी झोपडपट्टी निर्मूलनासाठी कामे करण्यात येणार आहेत.

शहरात 10 झोपडपट्ट्या
उस्मानाबाद शहरात 10 झोपडपट्ट्या आहेत. यामध्ये इंदिरानगर, भारत चित्रमंदिराच्या पाठीमागील भाग, ताजमहल चित्रमंदिराच्या पाठीमागील भाग, झोरे गल्ली, पापनाश नगर, डॉ. आंबेडकरनगर, वैराग नाका, आगड गल्ली, खॉजानगर, भीमनगर यांचा समावेश आहे. राजीव गांधी आवास योजनेंतर्गत या ठिकाणी घरांचे बांधकाम करण्यासह मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
4 लाखांपर्यंतचे घर
पात्र लाभार्थ्यांना 280 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधून देण्यात येणार आहे. प्रत्येक घरासाठी 4 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र शासन 75 टक्के, राज्य शासन 15 टक्के आणि 10 टक्के लाभार्थ्यांचा वाटा असणार आहे. तसेच रस्त्यांसाठी केंद्र 75 टक्के, राज्य 15 टक्के आणि पालिकेकडून 10 टक्के रक्कम भरण्यात येणार आहे. घरकुलाच्या लाभासाठी संबंधित व्यक्ती पाच वर्षांपासून त्या भागातील रहिवाशी असणे गरजेचे आहे.
2022 पर्यंत चालणार कार्यक्रम
झोपडपट्टी निर्मूलनासाठी 2013 ते 2022 पर्यंतचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. या काळात शहरातील संपूर्ण झोपडपट्ट्यांचे निर्मूलन करणे अपेक्षित आहे. सर्व्हेदरम्यान, कुटुंबातील व्यक्ती, रोजगाराचे साधन, शिक्षण, पाण्याची सोय, वीज, रस्ते आदींबाबत माहिती घेण्यात येत आहे.
राजीव आवास योजनेंतर्गत शहरात झोपडपट्टी भागातील सामाजिक व आर्थिक सर्व्हेचे काम सुरू आहे. नागरिकांनी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करावी. चार भागाचा सर्व्हे झाला असून, सध्या खॉजानगर आणि भीमनगर येथील सर्व्हे करण्यात येत आहे. याचा अहवाल पालिकेकडे पाठवण्यात येणार आहे.’’
एस. एस. राठोड, समन्वयक, अतुल ठोंबरे असोसिएशन, लातूर.
४यापूर्वीच्या घरकुल योजनेचा निधी कमी पडत होता. नव्याने सुरू झालेल्या राजीव आवास योजनेतून कमीत कमी पावणेतीन लाख रुपयांचा निधी लाभार्थ्यांना मिळणार आहे. शहरातील दहा झोपडपट्ट्यांमध्ये सर्व्हे सुरू असून, येत्या पंधरा दिवसांत राज्य शासनाकडे याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. गरजूंना घरकूल मिळवून देण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.’’
रेविता बनसोडे, नगराध्यक्षा.