आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसडीएम कार्यालयाने थकवला बदनापूरच्या शेतकऱ्याचा मावेजा, जप्तीची नामुष्की

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - पाझर तलावासाठी संपादित जमिनीचा ३ लाख ४७ हजार ३९० रुपयांच्या मावेजा मुदतीत न दिल्याने न्यायालयाच्या आदेशावरून शुक्रवारी एसडीएम कार्यालयात साहित्य जप्त करण्यात आले. बदनापूर तालुक्यातील निकळक येथील शेतकरी बद्री रंगनाथ वाघ यांच्या बाजूने दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी वर्ष २०१२ मध्ये निकाल दिलेला असून याच प्रकरणात मागील वर्षात दोन वेळा जप्ती झालेली आहे.

बद्री वाघ यांची निकळक शिवारातील गट नं. २०१ मधील १ हेक्टर २० आर शेतजमीन वर्ष २००५ मध्ये पाझर तलाव या सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आली होती. दरम्यान, संपादित जमिनीचा अल्पसा मावेजा मिळाल्यामुळे वाघ यांनी वर्ष २००६ मध्ये अॅड. रामकृष्ण बनकर व अॅड. राजेश वाघ यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला. या प्रकरणात २८ फेब्रुवारी २०१२ रोजी वाघ यांच्या बाजूने निकाल लागला. यात ३ लाख ४७ हजार ३९० रुपये मावेजा रक्कम देण्याचे आदेश ४ थे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर यांनी विशेष भूसंपादन अधिकारी (जिल्हाधिकारी कार्यालय, जालना) यांना दिले होते. मात्र, चार वर्षे उलटूनही मावेजा रक्कम दिली नाही, यामुळे ४ थे सहदिवाणी न्यायाधीश व स्तर यांनी जप्तीचे आदेश दिले होते. यानुसार मागील २ वर्षांत २ वेळा एसडीएम कार्यालयात जप्ती करण्यात आली. तरीसुद्धा मावेजा रक्कम न दिल्यामुळे शुक्रवारी तिसऱ्यांदा कार्यालयीन साहित्य जप्त केले.
बातम्या आणखी आहेत...