आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ' Smile Operations Blossom Mother's Smile On His Face

‘मुस्कान ऑपरेशन’ने फुलले आईच्या चेहऱ्यावर हास्य!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - गावात आलेल्या खेळणीच्या दुकानाबरोबर बाहेर गेलेला ११ वर्षांचा अरविंद पाल हरवला. मुंबईतून एका ट्रक चालकाने त्याला धारूर तालुक्यातील गावंदरा येथे आणल्यानंतर तो तेथेच राहिला. परंतु धारूर पाेलिसांच्या मुस्कान ऑपरेशन पथकामुळे चार वर्षांनतर अरविंद ६० तासांच्या रेल्वे प्रवासाने उत्तर प्रदेशातील जहानपूरला परतला. मुलाला पाहून आईसह कुटुंबातील लोकांना झालेला आंनद गगनात मावला नाही.

उत्तर प्रदेशातील मतेहपूर जिल्ह्यातील जहानपूर गावात खेळणीचे दुकान आल्यानंतर ११ वर्षांचा अरविंद रामभवन पाल हा मुलगा गावात त्या दुकानदाराला मदत म्हणून काम करू लागला. काही दिवसांतच दुकानदार त्याला घेऊन दुसऱ्या गावी गेला. मुंंबईला आल्यांनतर मात्र दुकानदाराने त्याला सोडून दिले. मुंबईतून तो गायब झाला. याची माहिती मिळाल्यांनतर त्याचे आई-वडील त्याच्या शोधात मुंबईला आले. मुंबई पिंजून काढूनही अरविंदचा तपास लागला नसल्याने त्यांनी मुंबई पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
शोध घेऊनही मुलगा सापडत नसल्याने आई-वडिलांची आशा मावळत चालली होती. काही दिवस मुंबईमध्ये भटकंती केल्यांनतर अरविंद एका ट्रक चालकाच्या मदतीने धारूर तालुक्यातील तेलगाव येथे आला. तेलगावहून तो पुढे गावंदरा येथे दोन वर्षे मिळेल ते काम करू लागला. गावात परराज्यातील मुलगा आला आहे. परंतु त्याला त्याच्या गावाकडे कसे जायचे आहे हे माहिती नव्हते. गावातील गोवर्धन नामदेव बडे यांनी ही माहिती धारूर पोलिसांना दिल्यांनतर पोलिसांनी चौकशी केली. हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या गावी पोहाेचवण्यासाठी पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी मुस्कान ऑपरेशन पथक स्थापन केले आहे. या मुस्कान ऑपरेशनच्या धारूर पोलिसांनी अरविंदला उत्तर प्रदेशला पाठवण्यासाठी पारसकर यांची परवानगी घेतली.
सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे, पोलिस जमादार बप्पासाहेब दराडे व गोवर्धन बडे हे ८ जुलै २०१५ रोजी अरविंदला बरोबर घेत जहानपूरला जाण्यासाठी रेल्वेत बसले व ६० तासांच्या प्रवासानंतर अलाहाबादला रेल्वेस्टेशनला उतरले. पुढे धारूर पोलिसांनी त्या ठिकाणाहून मतेहपूर जिल्ह्यातील थारीयाव पोलिस ठाण्याची मदत घेतली. जहानपूरच्या बीट अंमलदाराने फोन वरून मुलाच्या आई-वडिलांना माहिती दिली. तेव्हा दोन तासांत अरविंदची आई प्रभुदेवी पाल, चुलते राजबहादूर बाबादीन पाल, आजोबा स्वयंबाबू राजाराम पाल यांनी थारीयाव पोलिस ठाणे गाठले. चार वर्षांनंतर अरविंदला पाहून कुटुंबातील लोकांना रडूच कोसळले.

कुटुंबीयांची भेटीनंतर आम्हालाही समाधान
अरविंदला गावी सोडण्यासाठी रेल्वेत आम्हाला अनेक ठिकाणी जागेअभावी ताटकळत उभे राहावे लागले. त्याला पूर्ण पत्ता माहीत नसल्याने चुकीच्या रस्त्याने प्रवास करावा लागला. कुटुंबीयांची भेट झाल्यानंतर आम्हालाही समाधान वाटले.
संजय सुतनासे, सदस्य, मुस्कान ऑपरेशन, धारूर.