आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्याने घेतला गांजा तस्करांचा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - सव्वा क्विंटल गांजा घेऊन हैदराबाद येथून इंदूरकडे निघालेल्या भरधाव कारला रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन मध्य प्रदेशातील दोन तस्कर जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर आखाडा बाळापूर येथील तालुका रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना बुधवारी दुपारी 12:30 वाजता कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुलाजवळ घडली.

सोनू किशोर जैन (24, रा. इंदूर) आणि शकील हुसेन रहेमान हुसेन (35 रा. राजोड, ता. सरदारपूर, जि. धार) अशी मृतांची नावे आहेत. डोंगरगाव पूल गावाजवळील कयाधू नदीच्या पुलावरून गांजा तस्करांची कार (एमपी 09 पीसी 3559) भरधाव जात होती. पुलाच्या पुढे रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे भरधाव कार सुमारे 10 फूट उंच हवेत फेकली गेली आणि रस्त्याच्या कडेवरील झाडावर आदळली. यामध्ये सोनू आणि शकील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मयंक ऊर्फ सोनू मधुकर गुजर (25, रा. इंदूर) गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला आखाडा बाळापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे एपीआय पंडित कच्छवे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी गांजा आणि जीप जप्त केली असून गुन्ह्याची नोंद केली आहे.

पाठलागाच्या भीतीने भरधाव कार खड्ड्यात जाऊन झाडावर आदळली
आपला कुणीतरी पाठलाग करीत आहे, असा संशय आल्याने गांजा तस्करांनी कार जोरात दामटली असावी. डोंगरगाव पूल ते आखाडा बाळापूर मार्गावर अनेक वाहनांना मागे टाकत ही कार सुसाटपणे पुढे जात होती, असे डोंगरगाव पूल येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

70 लाखांचा गांजा
पोलिसांनी कारची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये प्रत्येकी सुमारे दोन ते अडीच किलो वजनाची 65 गांजाची पाकिटे आढळून आली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार गांजाची किंमत सुमारे 70 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
(फोटो - कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथे रस्ता अपघातात वाहनाचा चेंदामेंदा झाला.)