आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेने जपला माणुसकीचा धडा; दुष्काळग्रस्तांना दिला पाच हजार रुपयांचा किराणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा येथील एका शाळेच्या वतीने चकलांबा येथे दुष्काळग्रस्तांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा किराणा व सोलापुरी चादरसह कपडे वाटप करून बांधिलकी जपली. पन्नास कुटुंबीयांना ही मदत देण्यात आली.

गेवराई तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे, अल्प पावसामुळे यंदा खरिपाचा हंगामही वाया गेला, तर नापिकीला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. घरातला कर्ताच गेल्याने अशी अनेक कुटुंबं उघड्यावर पडली. अशा परिस्थितीत त्यांना व अपंग, निराधारांना दिलासा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा येथील "व्हीपीएस' शाळेचे मुख्याध्यापक सुधींद्र देशपांडे, स्काऊट शिक्षक संतोष तळपे, देशमुख, बबन इंगावलेंसह इतर शिक्षक, कर्मचारी व स्काऊटच्या सोळा विद्यार्थ्यांनी रक्कम एकत्र करून चकलांबा येथील वयोवृद्ध, निराधार, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य व अपंग अशा पन्नास कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा किराणा, सोलापुरी चादर आणि कपडे वाटप केले. चकलांबा येथे झालेल्या या कार्यक्रमास सुधींद्र देशपांडे, चकलांबा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर आदी उपस्थित होते. या वेळी गावाच्या वतीने संदीप रोजदे व कार्यकर्ते एस. के. देशमुख, संतोष रोकडे यांनी व्ही. पी. एस.चे मुख्याध्यापक देशपांडे यांचे केशर आंब्याचे रोपटे देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजन चकलांबा येथील संतोष रोकडे यांनी केले.

लाभार्थींना मदत
चकलांबाचे शिक्षक बबन इंगावले, संतोष रोकडे यांच्याकरवी येथील परिस्थिती लक्षात घेत आम्ही हा उपक्रम राबवला. खऱ्या लाभार्थींना मदत झाल्याचा आनंद व्हीपीएसचे एचएम सुधींद्र देशपांडे यांनी व्यक्त केला.