आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद- वर्षातील 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या आणि सोलर जिल्हा म्हणून घोषित झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात सौर ऊर्जानिर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. उस्मानाबाद शहरात प्रत्येक घरावर सोलर पॅनल उभारून ऊर्जानिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलर पॅनल बसविणार्या कुटुंबाला विविध करांमध्ये सवलत देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाचे सौर ऊर्जा धोरण जाहीर झाल्यानंतर म्हणजेच एक-दोन महिन्यात या कामांच्या मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सौर ऊर्जेच्या निर्मितीमध्ये क्रांतिकारी पाऊल टाकणारा उस्मानाबाद पहिला जिल्हा असेल. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद शहरात 1 मेगावॅट आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित 100 मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. उस्मानाबादनंतर तीर्थक्षेत्र तुळजापुरातही घरोघरी वीजनिर्मितीसाठी सौर ऊर्जेचे पॅनल उभारण्यात येणार आहेत. कौडगाव परिसरात एमआयडीसीचे 2 हजार एकर क्षेत्र सोलर पार्क म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत 500 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे.
अशी होणार ऊर्जानिर्मिती
20 हजार घरांची संख्या शहरात आहे.
एक मेगावॅट वीजनिर्मितीसाठी
> लाख स्क्वेअर फूट म्हणजे
>50 घरांच्या छताची जागा लागते.
किती खर्च?
एक मेगावॅट वीजनिर्मितीस सुमारे 7 कोटी रुपये खर्च
> सौर ऊर्जेसाठी वातावरण आणि नैसर्गिक साधन,संपत्ती असली तरी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर करावी लागत असल्यामुळे या उद्योगाला शासनाच्या पाठबळाची गरज आहे.
> शहरी भागात विभागलेल्या जागेवर निर्मितीसाठी दुपटीहून अधिक 15 ते 20 कोटी खर्च येतो.
> ऊर्जानिर्मितीसाठी अनुदान देण्यात येते.
>मात्र, सामूहिकरीत्या वीजनिर्मिती केल्यास किती अनुदान मिळणार, याबाबतचे धोरण अद्याप जाहीर झालेले नाही.
तर सौर ऊर्जेचा जिल्हा म्हणून उस्मानाबाद ओळखले जाईल
जिल्ह्यात नापिक असलेली जमीन आणि सौर ऊर्जेला आवश्यक असलेले वातावरण आहे. त्यामुळे उस्मानाबाद हा सोलर जिल्हा म्हणून घोषित केला. सौर ऊर्जेच्या दृष्टीने जिल्ह्यात महत्त्वाचे प्रकल्प येत आहेत. सहकार क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याने 1 मेगावॅट सौर ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प सुरू केला असून, एमएल इन्फ्रा कंपनीने तसेच महाजनकोने 75 मेगावॅट वीजनिर्मितीसाठी तयारी सुरू केली आहे. उस्मानाबादच्या घराघरावर तसेच कौडगाव एमआयडीसीमध्ये सोलर पार्क उभारल्यास उस्मानाबादची ओळख सौर ऊर्जेचा जिल्हा अशी होईल.
कुटुंबालाही करता येईल व्यवसाय
घराच्या छतावर तयार झालेली वीज संबंधित कुटुंबालाही वापरता येईल. शिल्लक वीज गुंतवणूक करणार्या संबंधित कंपनीला विक्री करता येईल किंवा वीजनिर्मितीसाठी संबंधित कुटुंबाने गुंतवणूक केल्यास वीज विक्री करून स्वत:चा उद्योग सुरू होऊ शकतो.
कुटुंबाला काय मिळणार?
नगरपालिकेने या उपक्रमासाठी महाराष्टÑ शासनाच्या ‘मिडा’ या अपारंपरिक ऊर्जा विभागासह काही कंपन्यांसोबत चर्चा केली आहे. कंपनीच्या खर्चाने पॅनल उभारणीसह वीजनिर्मितीचा खर्च करण्यात येणार आहे. त्यानंतर निर्माण झालेली वीज किंवा पालिकेच्या विविध करांमध्ये कुटुंबाला सवलत देण्यात येणार आहे.
कुठे तयार होईल ऊर्जा
घराच्या छतावर, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, व्यायामशाळेच्या इमारतीच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल उभारून वीजनिर्मिती करता येईल. ही वीज जनरेटरमध्ये साठवली जाईल. उत्पादित झालेली वीज पालिका घेईल. त्यानंतर ती कंपनीला विक्री करण्यात येईल. हा प्रयोग राबविल्यानंतर उस्मानाबादची ऊर्जेची गरज भागणार आहे.
उपयुक्त वातावरण
सौरऊर्जेसाठी असलेल्या उपयुक्त वातावरणाचा वापर क रून उद्योगांबरोबर रोजगाराचाही विचार करण्यात आला आहे. त्यामुळे सौर ऊर्जेसोबतच प्रकल्पाला लागणारी सामग्री तयार करणारे कारखाने एमआयडीमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.’
- राणा जगजितसिंह पाटील, आमदार
पुढे काय?
'उस्मानाबाद नगरपालिकेने देश-विदेशातील कंपन्यांसोबत या उपक्रमाविषयी सविस्तर चर्चा केली आहे. केंद्र शासनाकडून एप्रिलअखेरपर्यंत सौर ऊर्जेबाबत धोरणांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. या धोरणाची आता प्रतीक्षा आहे. घरांचा सर्व्हे करण्यात आला असून, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.