आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केक कापण्याऐवजी चिमुकल्याने दिला पित्याला अग्नी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिदखेड राजा - ज्या चिमुकल्या हातांनी तीन जानेवारीला कदाचित वाढदिवसाचा केक कापला असता त्याच हातांनी आल्या जन्मदिनी निरागस स्वार्थी जगाचा लवलेशही नसलेल्या दोनवर्षीय आर्यनला आपल्या वीर शहीद पित्याच्या पार्थिवाला चिताग्नी देतानाचे दृश्य बघून लोणार तालुक्यातील मांडवा गावी अंत्यसंस्काराला जमलेल्या हजारो नागरिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

काश्मीरमधील सियाचीन भागात कर्तव्यावर असलेले जवान योगेश दराडे २९ डिसेंबरला युद्धजन्य परिस्थितीत शहीद झाले होते. मात्र, सियाचीन येथील हिमवादळामुळे त्यांचे पार्थिव मूळ गावी लोणार येथे आणण्यासाठी तीन जानेवारीची पहाट उजाडली होती. नेमका याच दिवशी शहीद जवान योगेश दराडेचा दोनवर्षीय मुलगा आर्यनचा वाढदिवस होता. मात्र आपल्या जन्मदिनीच त्याला पित्याचे अंत्यदर्शन घेऊन पार्थिवाला चिताग्नी द्यावा लागला. ते दृश्य पाहणार्‍या आर्यनची आई भारती हिचाही शोक अनावर झाला होता. वर्षातून एखाददुसर्‍या वेळी गावी आलेल्या आपल्या वडिलांच्या अंगाखांद्यावर बागडणार्‍या आर्यनला अग्नी देताना काय होते हे समजले नाही. मात्र, उपस्थितांनी जेव्हा गहिवरून टाकणारे हे दृश्य बघितले तेव्हा त्यांच्या नेत्री केवळ आश्रू तरळले. त्यातही दुर्दैवी योगायोग म्हणजे अवघ्या एकच दिवसाने शहीद जवान योगेश दराडेंचाही वाढदिवस होता.

अंत्यविधीसाठी दुसरबीड, किनगाव राजा, जऊळका, तढेगाव, चोरपांग्रा, मलकापूर पांग्रा, बिबी परिसरातील हजारो नागरिक महिला उपस्थित होत्या. दिवसभर केवळ याच घटनेची चर्चा शहर परिसरात होती.