परळी वैजनाथ - ज्याच्या खांद्यावर जायचं त्या तरण्याबांड मुलाला खांदा देण्याची वेळ आली...! निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकून मुलगा आणि सुनेनं जीवनयात्रा संपवली. आता या चिमुकल्या चार नातवंडांकडं पाहून जगू कसं..? नागापूर (ता. परळी) येथील पंचाहत्तरी ओलांडलेल्या वृद्धाचा सवाल आणि खोलवर गेलेल्या डोळ्याच्या कडा पाहून प्रत्येकाचं हृदय हेलावून जात आहे.
नागापूर येथील अल्पभूधारक शेतकरी हनुमंत दगडू सोनटक्के यांना वडिलोपार्जित अडीच एकर जमीन आहे. हलक्या प्रतीची जमीन असूनही स्वत: कसत असल्याने इतरांपेक्षा अधिक उत्पन्न काढायचे. तीन वर्षांपासून मात्र पाऊस अनियमित होऊ लागल्याने उत्पन्न घटतच गेले. बारा महिने जमीन ओलिताखाली आणण्यासाठी कूपनलिका घेतली, तेथेही नशिबाने साथ दिली नाही. यंदा दुस-याकडून कर्ज काढून कापसाच्या तीन बॅगा लावल्या. तालुक्यात पाऊस नसल्याने कापसाला बोंडे लागलीच नाहीत. खते, फवारणी करूनही काहीच उपयोग झाला नाही. फवारणी करून राहिलेले औषध पुढच्या वर्षी लागेल, म्हणून घरात आणून ठेवले.
हनुमंत सोनटक्के यांच्या कुटुंबात वडील दगडू नामदेव सोनटक्के, पत्नी सुमित्रा आणि दोन मुले, दोन मुली असा परिवार. वडील दगडू सोनटक्के शेतात दोन बैल व म्हशीजवळ राहायचे.
यंदा स्वत:च्या शेतीतून उत्पन्नही गेले. दरवर्षी गावातील शेतक-यांकडे मिळणारं मजुरीचं कामही नाही. त्यामुळे घरात आर्थिक चणचण भासू लागली. घरातील आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने काही दिवसांपासून पती-पत्नी तणावातच वावरत होते. यातच शनिवारी सहा डिसेंबर रोजी बैल किंवा म्हैस विकण्यावरून पती-पत्नीत वाद जुंपला. बैल विकले तर शेती कशावर करायची आणि म्हैस विकल्यास घरातील दूध बंद होईल. या विवंचनेत दोघेही अडकले, नाराज होत गप्प राहिले. रात्री सात वाजण्याच्या सुमारास पत्नी सुमित्रा सोनटक्के यांनी कीटकनाशक प्राशन केले. हे पाहून पती हनुमंत सोनटक्के यांनीही तिच्या हातातील बाटली घेऊन कीटकनाशक प्राशन केले. आरडाओरड ऐकून शेजारचे लोक येईपर्यंत दोघांनी कीटकनाशकाची बाटली रिकामी केली.
सुमित्रा घरीच बेशुद्ध पडली. यानंतर गावातील लोकांनी दोघांनाही तातडीने अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले; परंतु रविवारी पहाटे सुमित्राचे, तर सोमवारी पहाटे हनुमंतने अखेरचा श्वास घेतला.
जन्मदात्रीनंतर सावत्र माताही गेली
हनुमंत सोनटक्के यांच्या पहिल्या पत्नीचा पाच वर्षांपूर्वी आकस्मिक मृत्यू झाला. या पत्नीच्या चार मुलांचा सांभाळ करण्याला अडचणी येत असल्याने त्याने दुसरे लग्न केले. दोघांचा संसार सुखाने चालला असतानाच आर्थिक विवंचनेत दोघांनीही जीवनयात्रा संपवली आणि चारही बालकांच्या नशिबी कायम अनाथाचं जीणं आलं. जन्मदात्रीनंतर सावत्र आईने आणि बापानेही जग सोडल्याने पालन पोषण कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वृद्ध पिता, चारही मुले अनाथ
पती-पत्नीने आत्महत्या केल्याने पोरक्या झालेल्या या कुटुंबात आठवीत शिकणारा हरिभाऊ, सहावीत शिकणारी पल्लवी, पाचवीत शिकणारी प्रतीक्षा आणि दुसरीत शिकणारा हृषीकेश ही चार अपत्ये आणि पंचाहत्तरी ओलांडलेले दगडू सोनटक्के अनाथ, निराधार झाले आहेत. घरात कर्ता पुरुष नाही आणि स्वयंपाक करून खाऊ घालणारी आई नाही. त्यामुळे चारही बालके अनाथ झाली आहेत, तर आयुष्याच्या शेवटच्या वळणाचा प्रवास करणारे वडीलही निराधार झाले.