बीड - ‘नकाे नपुंसक सहानुभूती, न्याय प्रक्रियेला द्या गती’, ‘जाग उठा है अाेबीसी.. खाली कराे अब कुुर्सी’, ‘महिलांवर अत्याचार, यावर उपाय एकीचं हत्यार’, ‘अन्यायाविरुध्द फुंकू बंकनळी, अत्याचारित हाेणार नाही अाता कळी’, अशा घोषणांचे फलक हाती घेत गेवराई तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी राज्यातील हजारो साेनार समाज बांधवांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. सर्वच ओबीसींनी या मोर्चाला पाठिंबा दिला.
स्त्री संरक्षणाच्या हक्कासाठी दहा सुवर्णकन्यांनी जिल्हाधिकारी एम.डी. िसंह यांना निवेदन दिले असून जिल्हाधिकारी हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहेत.
गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बुधवारी दुपारी बीडमध्ये राज्यातील हजारो सोनार समाज बांधव एकवटले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावरून दुपारी साडेबारा वाजता मूकमोर्चाला सुरुवात झाली. नगर राेडमार्गे हा मूकमाेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर माेर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील व्यासपीठावर दहा सुवर्णकन्यांनी मोर्चाला संबाेधित केले. युवतींनी स्त्री संरक्षणाची हाक देत काेणत्याही समाजातील युवतींना यापुढे अशा घटनांना सामाेरे जाण्याची वेळ येणार नाही, अशी गंभीर िशक्षा नराधमाला दिली जावी, अशी मागणी व्यासपीठावरून केली. या मोर्चात मंगेश लोळगे, भास्कर बागडे, कैलास मैड, सुरेश मेखे, कमलाकर कुल्थे, गणेश बागडे, कल्याण डहाळे, िवजूशेठ कुलथे, जनार्दन दहिफळ, दिनकर शहाणे, सोनाली शहाणे, राजेश टाक, हनू डहाळे, िहंमत बेदरे, दिनकर शहाणे यांच्यासह नियोजन समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
मोर्चानंतर राबवली स्वच्छता मोहीम
राज्यभरातून बीडमध्ये आलेल्या सोनार समाजातील मोर्चेकऱ्यांची फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आली होती. मोर्चा सुरळीत हाेण्यासाठी पोलिसांच्या दिमतीला शंभर स्वयंसेवक नेमण्यात आले होते. मोर्चाचा समारोप होताच मोर्चेकऱ्यांनी नगररोडवर स्वच्छता माेहीम राबवली.