आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonography Center Seal At Majalgaon, News In Marathi

नोंदी अपूर्ण; माजलगावात सोनोग्राफी सेंटरला सील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- बोर्ड न लावणे, रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे, रिपोर्ट न लिहिणे या कारणांवरून माजलगाव शहरातील डॉ. सुरेश साबळे यांचे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली.
माजलगाव शहरातील गढी रोडवरील डॉ. सुरेश साबळे यांच्या साबळे सोनोग्राफी सेंटरला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांच्या नेतृत्वाखालील अ‍ॅड. एम. वाय. मुंडे, डॉ. एम. व्ही. मुंडे, डॉ. सुमंत वाघ यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी भेट दिली. त्या वेळी पथकाला सोनोग्राफीचा बोर्ड दिसला नाही. रेकॉर्ड तपासल्यानंतर रुग्ण संख्येतही तफावत आढळली. किती महिलांची सोनोग्राफी करण्यात आली याची नोंदच नव्हती. तसेच सामग्री अद्ययावत नव्हती. रिपार्ट लिहिलेले नव्हते. त्यामुळे या पथकाने सोनोग्राफी सेंटर सील केले. त्यानंतर काकाणी हॉस्पिटलमध्ये धडकलेल्या पथकाने या ठिकाणीही रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर या ठिकाणी नोटीस बजावण्यात आली. या ठिकाणी दोन महिला दोन वेळेस सोनोग्राफीसाठी कशा आल्या, असा संशय आल्याने चौकशी केली.

दुपारी तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिल्यानंतर तेथे अस्वच्छता दिसून आली. साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. त्याचबरोबर डॉक्टरही जागेवर नव्हते. त्यामुळे या ठिकाणचे डॉ. मोराळे व डॉ. मोरे यांना जबाबदार ठरवत त्यांचे वेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आले.

पथक परळीकडे रवाना
माजलगावातील चार सोनोग्राफी सेंटरची तपासणी केल्यानंतर हे पथक परळीला रवाना झाले. या पथकाने कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी सोनोग्राफी सेंटरची तपासणी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.

वाघ यांना नोटीस बजावली
माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक सुमंत वाघ यांना दवाखान्यात साफसफाई, रुग्ण तपासणी केली नसल्याने आपली बदली का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. डॉक्टरांनी सोनोग्राफी सेंटर परवान्याचे नूतनीकरण न केल्यास त्यांना बोगस ठरवले जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोल्डे यांनी सांगितले.