आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागवड-वेचणी यंत्रानेच! परभणी कृषी विद्यापीठाचे कापूस-मक्यासाठी पीपीपी मॉडेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आगामी काळात कापूस व मका या पिकांची लागवड ते काढणी थेट यंत्राद्वारेच होऊ शकेल. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आधुनिक शेतीसाठी मोन्सँटो या कंपनीशी सामंजस्य करार केला असून यामुळे जागतिक तंत्रज्ञान थेट बांधावर येणार आहे.
या माध्यमातून खासगी-सरकारी भागीदारीतून (पीपीपी) शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देण्याचा प्रकल्प राबवणारे परभणीतील हे विद्यापीठ राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे.
विद्यापीठाचे उपसंचालक – संशोधक डॉ. गजेंद्र लोंढे यांनी सांगितले, कृषी विद्यापीठांनी स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्य राज्य सरकारच्या धोरणानुसार सरकारी-खासगी भागीदारी उत्तम पर्याय आहे. कृषी विद्यापीठ व मोन्सँटो यांच्यातील तीन वर्षांचा सामंजस्य करार याचाच एक भाग
असून संशोधन, जमीन, तांत्रिक मार्गदर्शन विद्यापीठ पुरवेल, तर मोन्सँटो प्रत्यक्ष पेरणी ते काढणी पर्यंत लागणाऱ्या सर्व निविष्ठा व यांत्रिक साहित्य पुरवेल. सध्या कापूस पिकासंबंधीचा प्रकल्प सुरू आहे. त्यात कापसाची यंत्राद्वारे पेरणी ते यंत्राद्वारे वेचणी यांचा समावेश आहे.
मोन्सँटो इंडियाच्या नॉलेज ट्रान्सफर विभागाचे प्रमुख डॉ. एस.एस. काझी यांनी सांगितले, सध्या कापूस वेचणीसाठी मजुरांची वानवा आहे. वेचणी वेळेवर झाली नाही तर होणारे नुकसान टाळण्यासाठी यांत्रिकी वेचणी हा उत्तम पर्याय आहे. मोन्सँटो सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र हे तंत्र बांधापर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विद्यापीठाशी पीपीपी मॉडेलनुसार काम सुरू आहे. मोन्सँटोने पंजाब व हरियाणामध्ये अशा स्वरुपाचे काम गव्हाच्या बाबतीत यशस्वीपणे केले आहे.

मक्याच्या नव्या जाती : मोन्सँटो व कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबादेत सेंटर ऑफ एक्सेलन्सची स्थापना करण्यात आली आहे. पैठण रोडवरील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या (एनएआरपी) प्रक्षेत्रावर मक्याच्या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती विकसित केल्या जात आहेत. मक्याची डिकाल्ब ९१३३ ही नवी संकरित प्रजाती नुकतीच सादर करण्यात आली. औरंगाबाद व परिसराशी अनुरूप अशा पध्दतीने ही संकरित जात तयार करण्यात आल्याचे डॉ. काझी यांनी सांगितले.

पीपीपी मॉडेल आहे तरी काय ?
>उत्पादन खर्च कमी करून अिधक उत्पादनासाठी सरकारी-खासगी भागीदारीतून प्रयत्न.
>कापूस लागवड ते वेचणीपर्यंतची सर्व कामे यंत्राद्वारे.
>सुसंगत व जास्त उत्पादन देणाऱ्या मका पिकाची जाती तयार करणार.
>विद्यापीठातील कृषी विद्या विभागातील (अॅग्रोनॉमी) शास्त्रज्ञ पिकांची पेरणी, खत-पाणी-तण व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करणार.

यांत्रिक वेचणीचे फायदे :
>कापूस वेचणीसाठी खूप मजूर लागतात. यांत्रिक वेचणीसाठी अत्यंत कमी मनुष्यबळ लागते.
>सध्या एक किलो कापूस वेचणीसाठी ८ ते १२ रुपये दर. यांत्रिक वेचणीत तो किलोमागे २ ते ३ रुपये पडतो. हा दर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. काझी यांनी सांगितले.
>वेळेवर वेचणी शक्य झाल्याने कापसाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा.
>यांत्रिक वेचणीसाठी एकरी ३० ते ४० मिनिटे लागतात.

कापूस उत्पादकांसाठी फायदेशीर :
कापूस लागवडीत सध्या मजुरांचा तुटवडा ही फार मोठी समस्या आहे. आपल्याकडे गव्हासाठी हार्वेस्टरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे कापूस वेचणीसाठी रेंटल तत्त्वावर यंत्राचा वापर होऊ शकतो. हा प्रकल्प सध्या प्राथमिक अवस्थेत आहे.
- डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक-संशोधन, व.ना.मराठवाडा कृ.वि.,परभणी
बातम्या आणखी आहेत...