आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीनच्या बोगस पावत्या; इंदूरहून बियाणे भरल्याची नोंद खोटी, माल उदगीरचाच !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - बोगस सोयाबीन बियाण्यांचा ट्रक चालकाने शुक्रवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात आणून जमा केला होता. हे बियाणे उदगीरच्याच ट्रान्सपोर्टमार्फत भरण्यात आले होते, परंतु दिशाभूल करण्यासाठी हा माल मध्य प्रदेशातील इंदूरहून येत असल्याच्या बोगस पावत्या तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही माहिती पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिली.

20 टन बोगस सोयाबीन बियाणे उतरून घेण्यास संबंधित दुकानदाराने नकार दिल्याने ट्रक ड्रायव्हर चंदू गवारे याने हा माल ठाण्यात आणून जमा केला होता. उदगीरच्या साईप्रसाद गुड्स ट्रान्सपोर्टमार्फत ट्रक (एमएच 26, एडी. 8084) मधून 20 टन बियाणे भरण्यात आले होते. हे बियाणे वाशीम येथे नेणार असल्याचे समजते, परंतु यातील आरोपींनी वेळीच ‘शाळा’ केली होती. बियाणे बोगस असल्याचा कोणालाही थांगपत्ता लागू नये म्हणून इंदूरहून माल आल्याच्या बनावट पावत्या बनवण्यात आल्या होत्या. उदगीर येथील बोगस बियाणे नेटवर्कचा पर्दाफाश झाल्याने आपल्यावरही धाड पडण्याच्या भीतीने संबंधित दुकानदाराने बियाणे उतरून घेण्यास नकार दिला. त्यामुळे ट्रकचालक गवारेवर ट्रक ठाण्यात आणून जमा करण्याची वेळ आली होती.

खरा आरोपी गुलदस्त्यातच, तपास पुढे सरकेना
बोगस बियाण्यांचा ट्रक शुक्रवारी रात्री ठाण्यात आणून जमा करण्यात आला असला, तरी हे बियाणे कोणत्या आणि कुठल्या व्यापार्‍याकडे पाठवण्यात येत होते, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.