आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात सोयाबीनला 2725 रुपये क्विंटल भाव; बाजार समितीत वाढली आवक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना -  गेल्या आठवडाभरापासून बाजार समितीत भुसार मालाची आवक घटली असताना मका आणि सोयाबीनची आवक मात्र स्थिर आहे. गेल्या दोन दिवसांत येथे १० हजार क्विंटल मका आणि सोयाबीनची आवक झाली असून त्यातून चार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. पुढील आठवडाभर सोयाबीनची आवक कायम राहील, मका काढणीचा हंगाम सुरू असल्याने पुढील काही दिवसांत आवक वाढेल, असे सांगितले जात आहे.  

अनेक शेतकरी दिवाळीपूर्वी घरात असलेला कापूस बाजारात आणून दिवाळीचा खर्च भागवतात. या वर्षी मात्र कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. एकीकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आली असतानाच अद्याप पणन महासंघ किंवा सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आठवडी बाजारात कापूस विक्रीसाठी आणत होते. परंतु आठवडी बाजारात अवघ्या तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी केला जातो आहे. शिवाय गेल्या १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने कापूस भिजला आहे, तर काही गावांमध्ये झाडावरच कापसाच्या वाती झाल्याचे चित्र आहे.

अशा परिस्थितीत दिवाळीसाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेला मका व सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले. मात्र ओलावा (मॉइश्चर) आणि वाढलेली आवक यामुळे मक्याला अत्यल्प दर मिळतो आहे. सध्या मक्याला कमाल १०११ रुपये, किमान ८७५ इतका कमी दर मिळतो आहे, तर सरासरी दर ९५१  रुपये आहे.

बाजारात येत असलेल्या मक्याच्या दाण्यांमध्ये जवळपास ४० टक्के ओलावा असल्याने दर कमी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे सोयाबीनची आवक मात्र वाढत चालली आहे. त्यामुळे शुक्रवारी एकाच दिवसात ७ हजार ८९१ क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याने सोयाबीनमधून एकाच  दिवसात २ कोटी १२ लाख रुपयांची उलाढाल झाली. सोयाबीनचा जालना बाजार समितीमधील दर १८०० ते २७२५ रुपयांपर्यंत असून सरासरी दर २५५० रुपये आहेत.  

हमी भावापेक्षा कमीच दर  
सोयाबीनला शासनाकडून २७५० रुपये हमी भाव जाहीर करण्यात आला आहे, तर बोनससहित ३०५० रुपये दर ठरविण्यात आला आहे. मक्यासाठी १३०० रुपये आधारभूत किंमत ठरविण्यात आली आहे. मात्र सध्या या दोन्ही शेतमालांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळतो आहे. सोयाबीनची वाढलेली आवक आणि त्यात असलेला मॉइश्चर यामुळे दर कमी असल्याचे सांगितले जात आहे.  

ज्वारीचीही आवक वाढली  
अनेक शेतकरी खास दिवाळीसाठी काही शेतमाल घरात साठवून ठेवतात. गरजेनुसार दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतर तो बाजारात विक्रीसाठी आणला जातो. ज्वारी आणि हरभरा त्यापैकीच एक आहे. त्यामुळेच शुक्रवारी ६०७ क्विंटल ज्वारीची आवक झाली, तर १६२ क्विंटल गावरान हरभरा बाजारात आला. हरभऱ्याला किमान ३१०० तर कमाल ४७७१ रुपये दराने खरेदी करण्यात आले. ज्वारीला चांगला दर मिळत असून शुक्रवारी किमान दर ११२५ तर कमाल दर १८६१ रुपये होता. तर साठवून ठेवलेल्या ज्वारीची आवक आणखी काही दिवस राहिल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...