आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाने दडी मारल्याने सोयाबीनला फटका, उत्पन्न घटणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिराढोण - सततच्या दुष्काळामुळे उसास नगदी पिकाचा पर्याय म्हणून सोयाबीनचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. परंतु पावसाने दडी दिल्याने पीक शेंगा लागण्याअगोदरच माना टाकत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शिराढोण महसूल मंडळातील १७ गावांमधील १८ हजार ८४९ हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी १६ हजार ३७० हेक्टरवर शेतकऱ्यांनी ९० टक्के सोयाबीन पेरणी केली. परंतु महसूल मंडळात जिल्ह्यातील इतर भागाच्या तुलनेत कमी पाऊस झाला. अद्याप एकाही मोठ्या पावासाची नोंद झाली नाही. छोटे तलाव, बंधारे, नदी-नाले कोरडे आहेत. सुरुवातीला आलेल्या पावसाच्या भरवशावर बळीराजाने सोयाबीनची पेरणी केली. रिमझिम पावसाने पीक चांगले आले, परंतु मागील २० दिवसांपासून परिसरात पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे.

शेंगा धरण्याअगोदरच सोयाबीन पीक कोमेजून निघत आहे. वेगवेगळ्या किडींच्या प्रादुर्भावाने पिकाच्या पानांची चाळणी झाली आहे. यंदाही हातात आलेले पीक जाण्याच्या भीतीने शेतकरी हताश झाला आहे. पावसाच्या कमतरतेने पीक वाढीची, फुलांपासून शेंगा तयार होण्याची प्रक्रिया खंडित झाल्याचे दिसून येत असून सोयाबीनचे उत्पन्न घटणार असल्याचा अंदाज शेतकरी वर्तवत आहेत. सततच्या नापिकीने मेटाकुटीला आलेल्या डोक्यावरील किमान कर्जाचे ओझे कमी होईल, अशी आशा शेतकऱ्याला होती.

दुष्काळ सहन होणार नाही
चार वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे आर्थिक गणिते कोलमडली असून मुलांच्या शिक्षणाचाही स्वप्नभंग होणार आहे. यंदा दमदार पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांना दुष्काळ सहन होणार नाही. - महादेव वाघमारे, शेतकरी, शिराढोण.
दुष्काळ शेतकऱ्यांच्या मुळावर
मागील २० दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन आणखी ८ दिवस पाऊस न आल्यास पूर्णपणे हातचे जाणार आहे. त्यामुळे दुष्काळ मुळावर उठण्याची चिन्हे आहेत. -राजाभाऊ पाटील, शेतकरी, शिराढोण

एकरी १५ हजार रुपयांचा खर्च
लागवडीपासून काढणीपर्यंत

>पेरणी- १ हजार,
>बियाणे-खते-३५००,
>फवारणी-२०००,
>कोळपणी-८००,
>खुरपणी-१५००,
>काढणी-२५००,
>मळणी-५००
बातम्या आणखी आहेत...