आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसपींचा कर्मचाऱ्यांना एमर्जंसी कॉल, थिएटरवर बोलवून दाखवला धोनी.. चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी गुरुवारी (दि. २०) पोलिस दलातील सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी शहरातील थिएटरवर बोलावून त्यांना अनपेक्षित असा मनोरंजनाचा धक्काच दिला. तीन तासांचा एमएस धोनी चित्रपट पाहून पोलिस कर्मचारीही तणावमुक्त झाले.

गंगाखेड रस्त्यावरील ई-स्क्वेअर अनसूया या चित्रपटगृहाच्या ठिकाणी पोलिसांनी तातडीने हजर राहावे, असा वॉकीटॉकीवरील मेसेज गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास धडकला. पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे ४०० कर्मचारीही अवघ्या काही मिनिटांतच चित्रपटगृहाच्या ठिकाणी दाखल झाले. सर्वांनाच काही तरी घडले आहे, अशी मनात शंका होती. त्यातच पोलिस अधीक्षक नियती ठाकर याही स्वत:च्या चित्रपटगृहाच्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यामुळे आगामी कार्यवाहीसाठी सज्ज झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने सूचनांकडे लक्ष ठेवले. या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय हिबारे, कोतवालीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड आदींसह अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी स्वत: ठाकर यांनी असे काहीच घडले नसून आज सर्वांना रिलॅक्स होण्यासाठी चित्रपट दाखवण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. सुटकेचा नि:श्वास टाकत पोलिस कर्मचारी चित्रपटगृहात दाखल झाले. तीन तास एम. एस. धोनी या चित्रपटाचा आनंद घेताना कर्मचारी तणावमुक्त झाले.

सततच्या कामातून विरंगुळा
^मागील तीन महिन्यांपासून सातत्याने पोलिस बंदोबस्तात असलेले पोलिस कर्मचारी सातत्याने कामात व्यग्र आहेत. कामाचा ताण वाढलेला असताना त्यांनाही कुठे तरी विरंगुळा, निवांत क्षण मिळावा, यासाठी मनोरंजनाची ही अनोखी भेट देण्याचे ठरवून त्यांना सरप्राइज दिले. यामुळे थोडा वेळ का होईना, पोलिस कर्मचारी तणावमुक्त झाले. यामुळे कामाचा उत्साह आणखी वाढेल. - नियती ठाकर, पोलिस अधीक्षक, परभणी
बातम्या आणखी आहेत...