आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलताबादेत स्पेअरपार्ट दुकानमालकास जाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - शहरातील फुलंब्री चौकातील ऑटोमोबाइल दुकानास मध्यरात्री आग लागल्याने दुकानात झोपलेल्या मालकाचा जळून मृत्यू झाला. दुकानाला बाहेरून तार बांधण्यात आल्याने षड्यंत्र रचून हा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील फुलंब्री चौकातून जाणार्‍या म्हैसमाळ रस्त्यालगत शेख सलाउद्दीन शेख नुरोद्दीन(42, रा. ठकारवाडी) यांचे सहारा ऑटोमोबाइल्स आहे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकानात झोपण्यासाठी गेले होते. मात्र, मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास त्यांच्या दुकानास चोहीबाजूने भीषण आग लागली. सलाउद्दीन यांनी आरडाओरड केल्याने दुकानासमोर राहणार्‍या मोहंमद नासेर जागे झाले व आवाजाच्या दिशेने धावत गेले. त्यांनी परिसरातील नागरिकांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु काही उपयोग झाला नाही. काही वेळात सर्व जळून खाक झाले होते. सलाउद्दीन यांचा कोळसा झाला होता.

दुकानातील साहित्य जळून खाक
आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सलाउद्दीन यांनी शनिवारी पन्नास हजार रुपयांचे साहित्य खरेदी केले होते. या साहित्यासह दुकानातील चार ते पाच लाखांचे इतर साहित्य जळून खाक झाले. ऑइलने पेट घेतल्याने आगीची तीव्रता वाढल्याचे बोलले जात आहे.
दुकानाला आग लागली की लावली याविषयी सर्वसामान्यांसह पोलिसही संभ्रमात आहेत. घटनास्थळी आग लावल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांना हाती लागलेला नाही. मात्र, दुकानाच्या शटरच्या कोयंड्याला बाहेरून तार बांधलेली आढळल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. आरोपींना तत्काळ पकडण्याची मागणी करत नातेवाइकांनी मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवला होता. यामुळे काही काळ तणाव पसरला होता.

श्वानपथक दाखल
या घटनेची माहिती मिळताच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते. श्वान उर्स मैदानाच्या कमानीपर्यंत जाऊन फुलंब्री चौक परिसरात फिरून आले. अद्याप पुरावा हाती लागलेला नाही.