आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : लोकवर्गणीतून नदीपात्र केले सरळ; 25 एकर आले वहितीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर - प्रत्येक वर्षी नदीला पाणी आले की ते लगतच्या शेतांमध्ये जाऊन शेतीचेच नदीपात्रात रूपांतर होऊन दगड, गोटे आणि वाळूमुळे जमीन नापीक झाली होती. ५० वर्षांपासून असलेल्या या समस्येवर शेतकऱ्यांनी एकजूट करून उत्तर शोधले. शासन आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीची आशा न ठेवता लोकवर्गणी जमा केली आणि नदीपात्राचे सरळीकरण केले. यामुळे नदीलगतची २५ एकर शेती वहिती करण्यास योग्य झाली आहे.  भोगलवाडीकरांनी इतरांपुढे आदर्श ठेवला आहे.  
 
धारूर तालुक्यात बालाघाटाच्या डोंगर कुशीत वसलेले पाच हजार लोकसंख्येचे भोगलवाडी गाव. गावाच्या पूर्वेस नदी पात्र आहे तर उत्तरेस एक किलोमीटर अंतरावर साठवण तलाव आहे. या नदीला मोठा उतार असल्याने प्रत्येक पावसाळ्यात नदीला पाणी आले की हे पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाते. ५० वर्षांहून अधिक काळ हा क्रम सुरूच आहे. शेतीत प्रत्येक वर्षी नदीचे पाणी जाऊन नदीलगतच्या शेतीतील मोठ्या प्रमाणावर जमिनीचे रूपांतरच नदीपात्रात झाले होते. शेतांमध्ये दगड, गोटे, वाळू झाल्याने जमीन नापीक झालीच होती, शिवाय त्यामध्ये झुडपेही उगवली होती. अनेक वर्षे गाळ न काढल्याने नदीपात्रही उथळ झाले होते.  त्यामुळे जमीन वहिती केली आाणि नदीला पाणी आले की सरळ शेतात येत  आणि नुकसान होई. नदीपात्राचे खाेलीकरण आणि सरळीकरण केल्यास परिसरात २५ एकरांहून अधिक जमीन वहिती करण्यास योग्य होत असल्याने लक्षात आल्यानंतर गतवर्षी काही शेतकतकऱ्यांनी नदी खोलीकरण व सरळीकरणासाठी पालकमंत्री पंकजा मुंडेंना निवेदन देऊन मागणी केली होती. परंतु शासनाकडून काही हा प्रश्न मार्गी लागला नाही.
 
शासन, लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देत नसल्याने आणि उपजीविकेचे साधन असलेली शेतीत दरवर्षी पुराचे पाणी जाऊन ती नापीक होत असल्याने शेतकऱ्यांनीच या प्रश्नावर उत्तर शोधण्याचे ठरवले आणि ज्या शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागतो अशा नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांनी एकरी दहा हजार रुपये वर्गणी जमा केली. यातून तब्बल  तीन लाख २५ हजारांचा निधी जमा झाला आणि नदीच्या खोलीकरण आणि सरळीकरणाला पोकलेनच्या साहाय्याने सुरुवात करण्यात आली. दोन मीटर खोली आणि  दहा मीटर रुंदी अशी दोन किलोमीटर सरळ नदी करण्यात अाली आहे. सुभाष तिडके, बाबू तिडके, रामलिंग तिडके, उत्तम तिडके, श्रीराम तिडके, चांगदेव तिडके, तुकाराम तिडके, नवनाथ तिडके, राजेभाऊ तिडके, केशव तिडके , रामराव तिडके, बालासाहेब तिडके, अंबादास तिडके, संजय तिडके या शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला.
 
शेतकऱ्यांचा पुढाकार, शेतकऱ्यांनाच फायदा   
- ५० वर्षांहून अधीक काळ शेतकरी या समस्येचा सामना करत होते. शासन, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने अखेर शेतकऱ्यांनीच वर्गणी केली. सढळ हाताने वर्गणी झाल्याने काम शक्य झाले असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. या  जमिनीतील झुडपे काढून शेतकऱ्यांनी यंदा शेती वहिती केली आहे.
  बाबू तिडके, शेतकरी, भोगलवाडी
 
६ दिवस चालले काम   
नदीच्या खोलीकरणाचे आणि सरळीकरणाचे काम सहा दिवस करण्यात आले. सावकुरा दरा ते गावापर्यंत नदी सरळीकरण करण्यात आले आहे. वळण घेतलेली नदी आता खोल झाले आहे. त्यामुळे शेजारच्या शेतांमध्ये पाणी जाणार नाही.
 
कपाशीचे पीक   
मीराबाई महादेव तिडके यांना नदीलगत दहा गुुंठे जमीन होती. मात्र दगडगोटे आणि वाळूमुळे या जमिनीत पीक घेता येत नव्हते. आता नदीचे सरळीकरण झाल्याने त्यांनी या वर्षी या जमिनीत कपाशीची लागवड केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...