आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPECIAL : इमारतींना घाबरणाऱ्या शहरात अंधश्रद्धा झुगारून बहुमजली घरे, इतिहास बदलला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद  - अनेक गावांमध्ये ग्रामदेवतेच्या भीतीपोटी घराच्या इमारतींवर मजले चढवले जात नाहीत. घरांवर इमला बांधला तर देवतेचा कोप होईल, अशी नागरिकांमध्ये भीती आहे. अशीच भीती उस्मानाबाद जिल्ह्यातले तालुक्याचे ठिकाण असलेल्या लोहाराकरांना होती. त्यामुळे शहर असूनही ७ वर्षांपूर्वीपर्यंत गावात एकही दुमजली घर नव्हते. मात्र, ही निव्वळ अंधश्रद्धा असून ती झुगारली पाहिजे, असा निश्चय नगराध्यक्षा पौर्णिमा जगदीश लांडगे यांनी केला. त्यांनी स्वत:च्या घरापासून बांधकामाला सुरुवात केली.  शासनानेही बहुमजली प्रशासकीय इमारत बांधून ही अंधश्रद्धा घालवली आहे.  मागील ७ वर्षांत लोहाऱ्यात बहुमजली २५ घरे उभारली आहेत.  
 
अनाहूत भीतीमुळे घर बांधताना अनेक बाबींचा विचार केला जातो.  घराची दिशा, स्वयंपाकघराचा कोपरा, अशा विविधांगांनी विचार होतो. ही शहरातली रीत. अनेक खेड्यांत तर ग्रामदेवतेच्या मंदिरापेक्षा घरांची उंची अधिक असू नये, अशी धारणा आहे. यातून अंधश्रद्धा फोफावली आहे. लोहारा शहरातही अशीच अंधश्रद्धा होती. नागरिकांना घरावर मजले चढवण्यास अलिखित बंदी होती. लोहारा शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर मार्डी गाव असून तिथे जिंदावलीचा दर्गा आहे. परिसरातील गावांमध्ये या दर्ग्याच्या घुमटापेक्षा उंचीचे घर बांधल्यास कुटुंबाची वाताहत होते,वं श बुडतो वगैरे, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे लोहारा शहराची लोकसंख्या १५ हजार आणि घरांची संख्या १९०० असूनही शहरात कुणीही बहुमजली घर बांधत नव्हते. 
 
२०१० मध्ये सर्वप्रथम लोहाऱ्यात बहुमजली इमारत बांधण्याचा निर्णय पौर्णिमा लांडगे यांनी घेतला आणि दोन वर्षांत घर बांधून त्या स्वत:च्या घरात राहण्यासाठी गेल्या. त्यानंतर  माळवदकर, नेताजी गोरेंसह  अनेक नागरिकांनी बहुमजली घर बांधली. आता शहरात २५ पेक्षा अधिक बहुमजली घरे आहेत. २०११ मध्ये भूमिपूजन झालेली प्रशासकीय इमारतही बहुमजली झाली आहे.  अंधश्रद्धेचे भूत उतरण्यासाठी पौर्णिमा लांडगे यांच्यासह त्यांचे पती जगदीश लांडगे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे आदींनी पुढाकार घेतला.  शहराने बदल स्वीकारला आहे. 

लांडगे या शिक्षिका असून, त्यांचे पती जगदीश लांडगे तलाठी आहेत.  आता प्रत्येक घराचा प्लॅनच बहुमजली  होत आहे. २१ व्या शतकात अंधश्रद्धा झुगारून झालेला हा बदल निश्चितच उल्लेखनीय आहे.   
 
पुढील स्लाइडवर वाचा, अंधश्रद्धा झुगारली... 
बातम्या आणखी आहेत...