आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speed Of Water Coming In Jayakwadi From Upper Dams Is Very Slow

जायकवाडीत निळवंडेचे पाणी अजूनही पोहोचेना!, 24 तासांत केवळ पाच दलघमी वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडी धरणात मराठवाड्यासाठी सोडण्यात आलेले १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडीत मंगळवारी रात्री दाखल होण्यास सुरुवात झाली. कमी वेगाने पाणी जायकवाडीत येत असल्याने २४ तासांत धरणाच्या जलसाठ्यात केवळ पाच दलघमीने वाढ झाली आहे. रविवारी सोडण्यात आलेल्या पाण्यापैकी निळवंडेचे पाणी बुधवारीदेखील जायकवाडीत दाखल झाले नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

जायकवाडीसाठी वरील धरणातून सोडलेल्या पाण्याचा कमी वेग कमी आहे. त्यातच नदीपात्रात पाणी झिरपण्याचे प्रमाण उन्हाळ्यासारखेच दिसत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात २४ तासांत विशेष वाढ झाली नाही. त्यातही निळवंडेचे पाणी आणखी दोन दिवसही जायकवाडीत दाखल होण्याची शक्यता नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. मुळा धरणाच्या पाण्याचा वेग कमी केला जात असल्याने साडेसात टीएमसी तरी पाणी धरणात येते की नाही याबद्दल शंका उपस्थित होत आहेत. जायकवाडीत किती पाणी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बॅकवॉटरमधील पाण्यात वाढ
गंगापूर । नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून झेपावलेले पाणी बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जायकवाडीच्या कायगाव येथील बॅकवॉटरमध्ये दाखल झाले. त्यामुळे तालुक्यातील बॅकवॉटरच्या क्षेत्रात हळूहळू वाढ होत आहे. नगरमधील निळवंडे व मुळा धरणातून झेपावलेल्या पाण्याचा ओघ मात्र कालच्या तुलनेत एक हजार क्युसेकने कमी झाला. नाशिक जिल्ह्यातील पाणी दुपारी दोनच्या सुमारास गंगापूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या नेवरगाव येथे दाखल झाले असून कानडगावमधील बॅकवॉटरमध्ये पाच ते सहा फुटांपर्यंत वाढ झाली.
निळवंडे व मुळा धरणांतून सोडलेल्या पाण्याचा वेग बुधवारी कमी झाल्याचे पाहावयास मिळाले.

येणारे पाणी (क्युसेकमध्ये )
निळवंडे - २ हजार
मुकणे - १ हजार
गंगापूर - १,६१७
दारणा - ५,१००
मुळा - १,६६०