आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्तावित ड्रायपोर्टसाठी जालन्याजवळील शिवारात स्थळपाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मराठवाडा व विदर्भात कच्च्या मालाची आयात व उत्पादित मालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी जालना तालुक्यातील दरेगाव शिवारात गट नं. ३१८ मधील गायरान जमिनीत ड्रायपोर्ट प्रस्तावित केलेला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व तहसीलदार रेवनाथ लबडे यांनी मंगळवारी सकाळी जागेची पाहणी केली.

केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी देशात १२ ड्रायपोर्ट उभारणार असल्याचे २५ जुलै २०१४ रोजी सांगितलेले आहे. देशाचा विकासदर वाढवण्यात ड्रायपोर्टची भूमिका महत्त्वपूर्ण राहील, असे संकेत त्यांनी दिलेले आहे. यापैकीच एक ड्रायपोर्ट जालना-औरंगाबाददरम्यान प्रस्तावित आहे. यासाठी २०० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यानुसार जालना शहरापासून जवळच असलेल्या दरेगाव शिवारात गट नं. ३१८ मध्ये शासनाची गायरान जमीन आहे. जागेच्या उपयुक्ततेबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने एक महिन्यापूर्वीच शासनाला दिलेला आहे.

अहवाल शासनाकडे
दरेगाव येथे ड्रायपोर्टसाठी जागा उपलब्ध आहे, असा अहवाल शासनास यापूर्वीच दिलेला आहे. दरम्यान, याची स्थळपाहणी जिल्हाधिकारी नायक यांनी मंगळवारी केली. एमआयडीसापासून ड्रायपोर्टपर्यंतचे अंतर, रेल्वेरूळ याबाबत सविस्तर चर्चा केली.

आयात-निर्यातीस प्रोत्साहन
जालनाच नव्हे, तर सबंध मराठवाडा अन् विदर्भातील बुलडाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यांच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात ड्रायपोर्टचे योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे. कच्चा माल आयात करून व उत्पादित पक्क्या मालाची देश-परदेशात निर्यात करण्यासाठी हा एक सक्षम व स्वस्त पर्याय ठरणार आहे.

स्थानिक उद्योग वाढीस प्रोत्साहन : जालना शहरास स्टील व बियाण्याची राजधानी म्हटले जाते. येथील स्टील कंपन्यांचे नामांकित ब्रँड असून यास देश-परदेशातून मोठी मागणी आहे. तसेच या ठिकाणी टप्पा ३ मध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीचे उत्पादन सुरू होत आहे. हीच स्थिती बियाणे कंपन्यांची आहे. स्टील कंपन्यांना भंगार लागते. त्यामुळे भंगारची आयात करणे व येथून सळई निर्यात करण्यात कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो.

डीएमआयसीची भरभराट
शेंद्रा येथील पंचतारांकित एमआयडीसीत डीएमआयसी (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर)चा झपाट्याने विस्तार होत आहे. डीएमआयसीमुळे जालना-औरंगाबाद ही दोन्ही शहरे जणू एकमेकास जोडली गेली आहे. ड्रायपोर्टमुळे हे अंतर आणखी कमी होईल.

होय, जागेची पाहणी केली...
बदनापूर तालुक्यातील दरेगाव शिवारात प्रस्तावित ड्रायपोर्ट जागेची पाहणी करून माहिती घेतली. अद्याप काही फायनल झाले नाही, यात प्रगती असल्यास सांगितले जाईल.
ए. एस.आर.नायक, जिल्हाधिकारी

जेएनपीटीकडूनही पाहणी
७ नोव्हेंबर रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या मुख्य प्रबंधक व समिती सदस्यांनी दरेगाव, दिनेगाव आणि जवसगाव येथे पाहणी केली. यात मुख्य प्रबंधक ए. के. बोस, कल्पा बैद, संचालक राम भोगले यांच्यासह ३ अधिका-यांचा समावेश होता. या अधिका-यांनी एमआयडीसीतील उद्योजकांशी संवाद साधला.