आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पथक गावात, ग्रामस्थ शेतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - कारला येथील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने खडबडून जागे झालेले आरोग्य विभागाचे पथक गावात गेले खरे; मात्र तोपर्यंत बहुतांश शेतकरी शेतात कामावर गेले होते. माळी पिंपळगाव, ममदाबाद, वडीवाडी, हातवण आणि भुतेगाव आदी गावांमध्येही असेच चित्र होते. त्यामुळे सर्वेक्षणासाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाला कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता आले नाही. सर्व ग्रामस्थ गावांत असतानाच सर्वेक्षण करावे, अशी मागणी सरपंचांसह अनेकांनी केली. दरम्यान, त्या महिलेला स्वाइन फ्लू झाल्याची माहिती आठवड्यानंतर मिळाल्याने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कारला (ता. जालना) येथील सुरेखा शरद काळे यांना 2 फेब्रुवारी रोजी सर्दी -खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. त्यामुळे पुढील चार दिवसांत त्यांना तीन वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले. त्यानंतर औरंगाबाद येथील एमआयटी रुग्णालयाने त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले. 8 फेब्रुवारी रोजी सुरेखा यांना स्वाइन फ्लू असल्याचे निदान झाले. त्यानंतरही जिल्हा आरोग्य विभागाला या प्रकाराची माहिती मिळण्यास आठ दिवसांचा कालावधी लागला. 15 फेब्रुवारी रोजी या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती कळल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने अहवाल देणारी प्रयोगशाळा अधिकृत असल्याची खात्री केली. त्यानंतर कारला गावात आणि परिसरातील पाच गावांमध्ये सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

उपकेंद्राला कुलूप

स्वाइन फ्लूने मृत्यू पावलेल्या सुरेखा काळे यांच्या घरासमोरच जिल्हा परिषदेचे आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र, ते कायमस्वरूपी बंदच असते. फक्त पोलिओ लस देण्यासाठी काही दिवसांपूर्वी ते उघडण्यात आले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.


आरोग्य विभागाचा दावा खोटा
आरोग्य विभागाला 10 फेब्रुवारी रोजीच माहिती मिळाली आणि त्यानंतर लगेचच कारला गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. भगत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. ग्रामस्थांनी मात्र रविवारी कारला गावात सर्वेक्षण सुरू झाल्याचे सांगितले. आरोग्य विभागाने केलेला दावा खोटा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
काय केले जात आहे
आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. भगत यांनी रविवारी कारला गावाला भेट देऊन गावातील सर्वेक्षणाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर सुरेखा काळे यांच्या घरी भेट देऊन त्यांना कोणत्या तारखेला कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे कोणती तपासणी झाली, उपचार काय झाले याची माहिती घेतली. यासंदर्भातील कागदपत्रे त्यांनी ताब्यात घेतली.
खासगी डॉक्टरांना पत्र देणार
जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना पत्रे देणार आहोत. त्यांच्याकडे दाखल होणाºया रुग्णांना स्वाइन फ्लूसदृश लक्षणे आढळली तर तातडीने आरोग्य विभागाला त्याची माहिती देण्यात यावी, अशा सूचना देणार आहोत. आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
डॉ. डी. डी. भगत, जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना
सर्वेक्षणाची वेळ बदला
सर्वेक्षण करणारे कर्मचारी 10 वाजता गावात आले. त्या वेळी सर्व ग्रामस्थ शेतात गेलेले असतात. काम आटोपल्यानंतर सायंकाळी उशिरा ते गावात येतात. त्यामुळे सकाळी लवकर सर्व्हे सुरू करावा आणि सायंकाळी उशिरापर्यंत कर्मचाºयांनी गावात थांबावे. एकनाथ खरात, सरपंच, कारला, ता. जालना