आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांना वेठीस धरून कर्मचारी नाचले संबळ, हलगीच्या तालावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पगारवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात बुधवारी बीडमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांनी हलगी अन् संबळाच्या तालावर ठेका धरत “आला बाबूराव’ गाण्याची फर्माईश केली. कहर म्हणजे पगारवाढीच्या या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांनी दौलतजादाही केली. एकीकडे ऐन दिवाळीत प्रवाशांना वेठीस धरलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनात एन्जॉय करत मागण्यांची धार कमी केलीच शिवाय प्रवाशांच्या संतापातही यामुळे भर पडली.  

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या संपाने सध्या प्रवाशांचे हाल होत आहेत. बीडमध्येही तीन हजारांवर कर्मचारी यात सहभागी आहेत. दरम्यान, बुधवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बीडमध्ये विविध संघटनांचे कर्मचारी एकत्र आले होते. आंदोलनात उत्साह संचारण्यासाठी आणि दणक्यात आंदोलन होण्यासाठी एक हलगी वाजवणारा अन् एक संबळ वाजवणाऱ्याला काही कर्मचाऱ्यांनी पाचारण केले होते. हलगीचा कडकडाट अन् संबळाचा नाद काही अतिउत्साही कर्मचाऱ्यांच्या अंगात असा काही भिनला की त्यांनी थेट या नादावर ताल धरला, तर काहींनी ‘आला बाबूराव’ची फर्माईश करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. हे कमी की काय म्हणून अतिउत्साहात बेभान झालेल्या काहींनी तर चक्क वेतनवाढीसाठी चाललेल्या या आंदोलनात ‘दौलतजादा’ केली. दरम्यान, या विरोधाभासाची आंदोलनस्थळी चर्चा सुुरू होताच एका कर्मचाऱ्याने जाऊन हा प्रकार थांबवला अन् बिदागी देत हलगीवाल्याला मार्गस्थ करून थिल्लरपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही त्याने चांगलेच कान उपटले. प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन एन्जाॅय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मात्र प्रवाशांनी संताप व्यक्त केला.  

एसटीचा भार रेल्वेवर; प्रवाशांचे हाल
सोमवारी रात्री १२ पासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची प्रचंड दैना होत आहे. दुसऱ्या दिवशीही संप सुरूच राहिल्याने  प्रवाशांचा संपूर्ण भार रेल्वेवर आणि काही खाजगी प्रवासी वाहतुकीवर आला आहे. मराठवाड्यातील रेल्वेस्थानके प्रवाशांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत.  

खाजगी आराम बसेसचे भाडे चौपट झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेशिवाय पर्यायच उरला नाही. गावाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची या संपामुळे मोठीच अडचण झाली आहे. भाऊबिजेला माहेरी जाण्यासाठी सासूरवासिनींना प्रवासाचे साधनच उपलब्ध होईना. त्यामुळे सासरीच दिवाळी साजरी करण्याची त्यांच्यावर वेळ आहे.  सर्वच खाजगी वाहनचालकांसाठी ही दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी ठरत असून सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र दिवाळे निघत आहे. बसेस उपल्बध नसल्याने आणि दिवाळीची सुटी वाया जाऊ नये म्हणून अनेक जणांनी दुचाकीनेच प्रवास करण्यास पसंती दिल्याचे चित्रही  दिसले. 
बातम्या आणखी आहेत...