(फाइल फोटो - अमिता चव्हाण )
नांदेड - काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता यांची भोकरमधील उमेदवारी कापल्याची चर्चा शनिवारी होती. अशोकरावांनी अमिताच अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला खरा; पण प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी त्यांना पक्षाने बी फॉर्म दिला नसल्याचे सांगितले. मात्र त्यांनी अर्जासोबत पक्षाचे ए व बी असे दोन्ही फॉर्म दाखल केले. त्यामुळे त्यांना उमेदवारी नेमकी दिली कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशोकराव लोकसभेवर गेल्याने अमितांनी भोकरमधून तयारी सुरू केली. या जागेवर इतर कोणी दावाही केला नाही. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आधी बी. आर. कदम व नंतर अचानक नरेंद्र चव्हाण यांचे नाव आले. या पार्श्वभूमीवर "दिव्य मराठी'ने ठाकरेंशी संपर्क साधला असता त्यांनीही चव्हाण यांना बी फॉर्म दिल्याचे सांगितले. काँग्रेसच्या यादीतही त्यांचेच नाव होते.
संभ्रमात भर
अशोकरावच उभे राहणार असल्याची चर्चा सुरू झाली. संपर्क साधला असता, शक्यता नाकारत नाही. पण कन्फर्म सांगत नाही, असे ते म्हणाले. स्वत: अशोकराव, अमिता, नरेंद्र चव्हाण, कदम, गणपतराव तिडके हे अर्ज भरण्यासाठी गेल्याने संभ्रमात भर पडली.
नरेंद्र चव्हाण सोबतच
काँग्रेसने नरेंद्र चव्हाणांना उमेदवारी दिली, पण अर्ज भरण्यासाठी ते वेळेवर पोहोचू शकले नाहीत. ऐन वेळी अमितांनी अर्ज दाखल केला, असे अशोकरावांनी सांगितले. विशेष म्हणजे अमितांच्या अर्जाच्या वेळी नरेंद्र सोबतच होते.
माणिकराव अंधारातच
पुन्हा संपर्क साधला तेव्हा माणिकराव म्हणाले, अमितांना बी फॉर्म दिला नसून, नरेंद्र चव्हाणच अधिकृत उमेदवार आहेत. पण नरेंद्र यांनी अर्जच भरला नसल्याचे निवडणूक अधिकारी म्हणाले.