आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासुरवाडीत आले पाणी,अजितदादा पुन्हा फॉर्मात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- इंदापूर तालुक्यातील सभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आल्यानंतर जवळपास महिनाभर संयत शब्दांत बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पुन्हा पूर्वीच्या फॉर्मात दिसले. उस्मानाबादेतील उजनी पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या वेळी अजित पवारांच्या तडाखेबंद भाषणातील कोपरखळ्या, मिश्किली त्यांच्याच शब्दांत...

उस्मानाबादच्या कार्यक्रमात ढोबळे, ओमराजेंना टोले
० आमच्या सासुरवाडीला पाणी आले का नाही, असे मी मधुकरराव चव्हाण यांना विचारत होतो. पण ते म्हणाले, गुत्तेदाराकडून दोन पाइप टाकायचे राहून गेले. वा..रे गुत्तेदार!. पाइपच नाही टाकल्यावर पाणी कसे येणार?

० आमच्या गावात छोट्याशा कार्यक्रमाला गर्दी होते. इथे दुष्काळामुळे माणसांचा अभाव दिसतोय. काळजी करू नका, आम्ही गेल्यानंतर पाणीही जाईल, असे काही नाही. काही झाले तरी आम्ही उस्मानाबादकरांना पाणी पाजायचे ठरवले आहे. त्यामुळे पाणी सुरूच राहील.

० आता आले पाहा ढोबळे साहेब. या साहेब, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री अगोदर आणि पाणीपुरवठा मंत्री उशिरा? असो, तुमचे आमच्या वतीने स्वागत. नाहीतर उद्या लगेच हेडलाइन होईल अजितदादा बोलले म्हणून. बोलायचीही पंचाईत झाली आहे. पक्षातल्यांनाही बोलायचे नाही का?

० विरोधी पक्षातले आमदार (ओमराजे निंबाळकर) राजदंड पळवणार असल्याचे आम्हाला आधीच कळले होते. श्रेयासाठी पळवापळवी योग्य नाही. पाणी येणार दिसताच त्यांनी उपोषण केले. ज्याचे त्याला श्रेय द्या.

चिंता दुष्काळाची की दट्ट्याची : दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍याचा सपाटाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लावला आहे. शनिवारी ते उस्मानाबादच्या दौर्‍यावर होते. उजनीच्या पाण्याचे त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या वेळी मुख्यमंत्री चिंतनात गढलेले, तर पालकमंत्री मधुकर चव्हाण यांचा कपाळावर हात दिसला. यामुळे मंत्रिमहोदयांना दुष्काळाची चिंता आहे की, त्यावर उपायांसाठी श्रेष्ठींकडून येणार्‍या दट्ट्याची, असाच प्रश्न पडला.

उस्मानाबाद सासुरवाडी : उस्मानाबाद ही अजित पवारांची सासुरवाडी आहे. पवारांच्या पत्नी सुनेत्रा खासदार पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत.