आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयीचे राजकारण: निवडणुकीत फेस टू फेस; पोटनिवडणुकीत आघाडी धर्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराने अडीच वर्षे न्यायालयीन लढाई सुरू ठेवून काँग्रेसच्या नगरसेवकाला अपात्र ठरवण्यात यश मिळवले. मात्र, पोटनिवडणूक लागताच त्यांच्याच पक्षाने पदवीधरच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी धर्म पाळत असल्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. तगडा उमेदवार नसल्यामुळेच राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला असून त्याला आघाडी धर्माचा मुलामा दिला जात आहे.

दोन वर्षांपूर्वी लातूर महापालिकेची झालेली पहिली निवडणूक फारच गाजली होती. सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या विरोधात आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेच शड्डू ठोकला होता. विलासरावांच्या विरोधात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लातूरमध्ये येऊन टीकास्त्र सोडले होते. महापालिकेचे कारभारी बदला अशी घोषणा देत पवारांनी काँग्रेसमधील असंतुष्ट फोडले. विलासरावांच्या प्रभावामुळे सत्ता आली नसली तरी 13 जागा जिंकून राष्ट्रवादीने लातूरमधला प्रमुख विरोधी पक्ष ही जागा निर्माण केली. पुढे झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादी असाच संघर्ष झाला. त्यात दोन्ही पक्षांनी एकेकदा विजय मिळवला. सभागृहातही या दोन्ही पक्षांमधून विस्तव जात नाही. त्यामुळे राज्यात विरोधी असलेल्या सेनेला सभागृहात विरोधी पक्ष म्हणून कुणीच ओळखत नाही. भाजपचा तर एकही सदस्य निवडून आलेला नाही.

या परिस्थितीत प्रभाग क्रमांक 13 अ मधून निवडून आलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार शिवप्रसाद शृंगारे यांनी याचिका दाखल केली. बेद्रे यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आले. त्यानंतर ही पोटनिवडणूक लागली. शृंगारे यांना राष्ट्रवादी तिकीट देईल अशी आशा होती. मात्र ऐनवेळी पक्षाने माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे शृंगारे यांचा हिरमोड झाला आहे.

कोणत्याच पक्षाकडे तगडे उमेदवार नाहीत
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या प्रभागात कोणत्याच पक्षाकडे तगडा उमेदवार नाही. त्यामुळेच बेद्रे यांचा विजय झाला होता. विजय अजनीकर यांनी बसपाकडून निवडणूक लढवली होती. त्यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. याही वेळेस ते मैदानात उतरले आहेत. पण त्यांना बसपाने बी फॉर्म दिलेला नाही. तर भाजपकडून उभे ठाकलेल्या तुषार गायकवाड यांना ऐनवेळी बी फॉर्म मिळाला. राष्ट्रवादीचे शिवप्रसाद शृंगारे निवडून येतील याची खात्री नाही. त्यामुळे त्यांनीही माघार घेतली आहे.

पक्षाने ऐनवेळी माघार घेतली
पराभूत झाल्यानंतर दोन वर्षे न्यायालयीन लढाई केली. न्याय मिळाल्यानंतर निवडणुकीची तयारी करा, असे शहराध्यक्ष मुर्तुजा खान यांनी सांगितले होते. त्यानुसार बैठका घेतल्या, याद्या बनवल्या. मात्र आज अर्ज भरताना ऐनवेळी अधिकृत उमेदवारी देणारा बी फॉर्मच दिला नाही. त्यामुळे माझा अपक्ष फॉर्म दाखल केला आहे.
-शिवप्रसाद शृंगारे, राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारलेले

आघाडीचा धर्म
पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काँग्रेस मदत करीत आहे. आता पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी हे चित्र रंगले तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल.
- मुर्तुजा खान, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी