आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा छावण्या सुरू करण्याची सरकारला उशिरा का होईना आली जाग, राज्य शासनाचा अध्यादेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. यावर्षी तर तब्बल दीड महिन्यापेक्षाही अधिक काळ वरूणराजाने दडी मारल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई असतानाही छावण्या सुरू होत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. उशिरा का होईना मायबाप सरकारने छावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. बडे बागायतदार आणि कारखानदाराला चाप लावतानाच सामान्य शेतकऱ्याला दिलासा दिला आहे.

जिल्ह्यात सध्या पशुधनाची संख्या ८ लाख २२ हजार ३६४ अशी आहे. ११ तालुक्यांत ६ लाख ९७ हजार ९७८ मे. टन चाऱ्याची वार्षिक तूट निर्माण झाली आहे. या तालुक्यात चारा छावणी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम यांनी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना १२ अॅागस्ट रोजी अहवाल पाठवला आहे, परंतु शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय केव्हा होईल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अखेर राज्य शासनाने मराठवाड्यातील बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात जनावरांच्या छावण्या उघडण्यासाठी अध्यादेश काढला अाहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने २०१२ मध्ये केलेल्या पशुगणनेनुसार लहान जनावरे २ लाख २५ हजार ६५७, तर मोठी जनावरे ५ लाख ९६ हजार ७०७ अशी आहेत.
रिमझिम पावसावरच हिरवा चारा जिल्हात अाजपर्यंत एकूण १५४.४७ मि.मी. पाऊस झाल्याने माळरान व डाेंगरमाथ्यावर जी हिरवळ अाली अाहे, त्यावरच शेतकरी जनावरांना चरण्यासाठी साेडत अाहेत. शेतकरी पावसाने पडीक बांध व इतर माेकळ्या जागेवर उपलब्ध झालेल्या चाऱ्याचा अाधार घेत अाहेत, तर काही िठकाणी अन्य जिल्ह्यांतून शेतकरी चारा उपलब्ध करून घेत अाहेत.
अाष्टी तालुक्यात सर्वाधिक पशुधन
जिल्ह्यात सर्वाधिक जनावरांची संख्या ही अाष्टी तालुक्यात एक लाख २४ हजार ५१० अशी अाहे. त्यानंतर बीड तालुक्यात एक लाख १५ हजार ९९१, गेवराईत ९८ हजार ५१५, केजमध्ये ९५ हजार ७९, परळीत ६८ हजार २३० अशी असून एकूण जिल्हाभरामध्ये अाठ लाख २२ हजार ३६४ जनावरांची संख्या अाहे.
छावण्यांची तपासणी
तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी अाठवड्यातून दाेन वेळा, तर उपजिल्हाधिकारी यांच्याकडून १५ दिवसांनी एक वेळा छावण्यांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे.
पाऊस होईपर्यंत छावण्या सुरू
उस्मानाबाद - चाराटंचाईबाबत विभागीय आयुक्तांनी ३१ जुलै रोजी शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानुसार उपाययोजनांसंदर्भात ११ ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. यावेळी उस्मानाबादसह तीन जिल्ह्यात चारा छावण्या उघडण्याबाबत निर्णय झाला आहे. या भागात आवश्यकतेप्रमाणे चारा उपलब्ध होईपर्यंत व समानधानकारक पाऊस होईपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. टंचाईग्रस्त भागात अंतिम पर्याय म्हणून छावण्या सुरू करण्यात
येणार आहेत.
११ संस्थांची छावणी सुरू करण्याची इच्छा
लातूर - जिल्ह्यातील एकूण सहा लाख जनावरांपैकी सुमारे दोन ते अडीच लाख जनावरे चारा छावणीत दाखल होऊ शकतील, असा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. आजघडीला एक चारा छावणी सुरू असून इतर ११ संस्थांनी छावणी सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी "दिव्य मराठी'शी
बोलताना दिली. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेले अर्ज संबंधित तहसीलदारांकडे पाठवण्यात आले असून जेथे चारा छावणी सुरू करण्याची इच्छा संस्थांनी व्यक्त केली आहे तेथे प्राथमिक सुविधा आहेत काय, याची पाहणी करण्यात येत आहे. रस्ता, वीज, पाणी इत्यादी बाबींच्या पडताळणीचे काम सुरू आहे, असे पोले यांनी सांगितले. ज्यांच्याकडे दुभती जनावरे आहेत, त्यांच्याकडे हिरव्या चाऱ्याची सोय असते. त्यामुळे ती जनावरे छावण्यांमध्ये पाठवली जात नाहीत.
तसेच बैलांकडून काम करवून घ्यायचे असल्यामुळे त्यांचीही संख्या कमी असते. छावण्यांमध्ये भाकड जनावरांची संख्या जास्त असते हे गृहीत धरून नियोजन केले जाते, असे ते म्हणाले.

नांदेड जिल्ह्याला डच्चू
नांदेड - उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश शासनाने गुरुवारी जारी केले. चाऱ्याची तीव्र टंचाई असतानाही नांदेड जिल्ह्याला मात्र वगळले. नांदेड जिल्ह्यात ६ लाख ४९ हजार मोठी व २ लाख लहान छोटी जनावरे आहेत. दोन्ही मिळून ८ लाख ५० हजार २५० पशुधन जिल्ह्यात आहे. या जनावरांसाठी प्रति दिवशी ४ हजार ४९८.६७ मेट्रिक टन चारा लागतो. महिन्याला १ लाख ३४ हजार ९६०.१३ मे. टन चारा लागतो. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने जनावरांना शेतातील ओला चारा नाही. सध्याचा चारा साठा जनावरांना २९ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या प्रभारी उपायुक्त डॉ. स्मिता उके यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्या उघडण्याची अत्यंत गरज आहे. लोहा, कंधार, देगलूर, मुखेड, बिलोली या तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. या तालुक्यांत जनावरांच्या चारापाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित माहितीचे ग्राफिक्‍स..