जालना- गेल्याचार वर्षांपासून पाऊस नसल्याने मराठवाड्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात शिव जलक्रांती योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
जालना विधानसभा मतदारसंघात आमदार अर्जुन खोतकर यांनी तीनशे ओढे-नाले खोलीकरण करण्यासोबतच बंधारे उभारले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाची दखल घेऊनच संपूर्ण मराठवाड्यात हा उपक्रम राबविण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे उद्योगमंत्री देसाई याप्रसंगी म्हणाले.
पाणीपातळीत वाढ
शिवजलक्रांती अंतर्गत जालना तालुक्यातील वखारी, नाव्हा, बाजीउम्रद परिसरात ३०० पेक्षा अधिक बंधारे उभारले. पावसाळ्याच्या प्रारंभी यातील बहुतांश बंधारे भरले. नाव्हा येथे विहीर कोरडी पडली होती, परंतु तेथे नाला खोलीकरणानंतर विहिरीचे पाणी वाढले आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना हा दिलासा असल्याचे देसाई म्हणाले.