आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Minister Patangrao Kadam Comment In Nanded

अतिवृष्टीग्रस्त भागांतील रस्त्यांसाठी निधी : कदम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या विदर्भाला 450 कोटींचा निधी दिवाळीच्या पूर्वसंध्येला देण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील 4 तालुक्यांना 29 कोटी रुपयांचा निधी बुधवारी देण्यात आला. अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या भागात रस्ते दुरुस्तीसाठीही तरतूद करण्यात आली. हिवाळी अधिवेशनात यावर निर्णय घेऊन निधी देण्यात येईल, अशी माहिती वन व मदत पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी बुधवारी दिली.

हदगाव येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मंत्री कदम म्हणाले, देशातील एकूण सहकारी चळवळीपैकी 50 टक्के सहकारी चळवळ राज्यात आहे. यशवंतराव चव्हाणांनी या चळवळीची पाळेमुळे रोवली; परंतु सहकारी बँका, राज्य बँकेने मनमानी करत ही चळवळ मोडकळीला आणली. गैरव्यवस्थापनामुळे सहकारी साखर कारखाने बंद पडले, असेही कदम म्हणाले.

25 टीएमसीसाठी ठाम
मराठवाड्यासाठी उजनी धरणातून 25 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना औरंगाबादच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता. या निर्णयाला कोणीही विरोध केलेला नाही. त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. मराठवाडा हा अविकसित भाग आहे. विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झाला आहे. या भागाला झुकते माप देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न आहे. सहकारी साखर कारखाने का बंद पडत आहेत व ते का विकावे लागत आहेत, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सहकारी साखर कारखानदारी व्यवसाय म्हणून चालली पाहिजे.
-हर्षवर्धन पाटील, सहकारमंत्री

साखर उद्योगासाठी उपाययोजना
राज्यातील साखर उद्योग वाचवण्यासाठी काही उपाययोजना करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या प्रस्तावातील
प्रमुख तरतुदी-
0 साखरेसाठी प्रतिक्विंटल 500 रु. अनुदान कारखान्यांना देण्याचा निर्णय
0 50 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करणार 0 कच्च्या साखरेवर अनुदान देण्याचा विचार
0 अनुदानासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा शासनाचा निर्णय

पिकांच्या नुकसानीपोटी अडीच हजार कोटींची मदत
हिंगोली- अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त हिंगोली जिल्ह्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. पिकांच्या नुकसानीपोटी 2 हजार 450 कोटी रुपयांची मदत देण्याची जाहीर घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी केली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 922 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. कदम यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर आमदार भाऊराव पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.