आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातल्या विद्यार्थ्यांना रँचो बनवायचंय : तावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - तुमच्यापैकी किती जणांनी "थ्री इडियट' नावाचा सिनेमा पाहिलाय? त्यात अामिर खानने साकारलेला "रँचो' माहीत आहे? आणि घोकंपट्टी करणारा चतुरलिंगम? मला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना हाताशी असलेल्या साहित्यातून संशोधन करणारा "रँचो' बनवायचंय, केवळ घोकंपट्टी करणारा चतुरलिंगम नाही... हे उद्््गार आहेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे. केशवराज विद्यालयात तावडेंनी दहावीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते.
अंबाजोगाईच्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या लातूरमधील केशवराज विद्यालयातील खुल्या सभागृहाला दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले असून त्याचे उद््घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर शिक्षणमंत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी मुक्त संवाद साधला. औपचारिकता बाजूला ठेवून तावडे विद्यार्थ्यांमध्ये मिसळले. त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांचे प्रश्न ऐकून त्यास मुक्तपणे उत्तरेही दिली.

विनोद तावडे म्हणाले की, मी शाळेत असताना शिकवणाऱ्या शिक्षिकेने मला पृथ्वी आणि चंद्राचे अंतर अमुक प्रकाश वर्षे आहे असे सांगितले. त्यावर मी ‘ते कसे मोजले,’ असा प्रश्न त्यांना विचारला. त्यानंतर मला तो प्रश्न परीक्षेत येणार नाही म्हणून गप्प करण्यात आले. मात्र, आमच्या पिढीला माहिती मिळवण्याचे मार्ग कमी असल्यामुळे तो प्रकार एक वेळ धकून गेला. मात्र, सध्याची पिढी फारच हुशार आहे. टीव्ही, इंटरनेट या माध्यमातून माहिती मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न पडावेत आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देता यावे, असा अभ्यासक्रम बनवला जात आहे. दहावी पास-नापासांसाठीही करिअर काउन्सेलिंग करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना विनोद तावडे यांनी घोकंपट्टीचा पॅटर्न बंद करून गुणांचा फुगवटा कमी करण्यात येईल. यापुढच्या काळात ५० टक्के गुण घोकंपट्टीला आणि ५० टक्के गुण विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांना देण्यात येतील. त्यामुळे गुणांचा फुगवटा कमी होईल. एका विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एटीकेटीची मागणी केली. मात्र, सगळ्या आघाडीच्या कंपन्या एटीकेटीचा आधार घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकऱ्या देत नाहीत. त्यामुळे एटीकेटीच्या मागण्या करत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलेले उत्तम, असा सल्ला त्यांनी दिला. आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संधी मिळत नसल्याचा प्रश्न एका विद्यार्थिनीने उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, मागे पडलेल्या समाजातील एका घटकाला सशक्त बनवण्यासाठी आरक्षणाची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. ती चुकीची असल्याचा समज करून घेऊ नये. हळूहळू ती बंद होत जाईल. क्रीमिलेअर हा त्याचाच एक भाग आहे आणि मुळात सरकारी नोकऱ्याच उपलब्ध नसल्यामुळे आरक्षणाचा मुद्दा मागे पडत चालल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सतीश पत्की, अनिल महाजन, आमदार सुधाकर भालेराव, अतुल ठोंबरे, महापौर अख्तर शेख यांची उपस्थिती होती.

७ वैद्यकीय महाविद्यालयांची
"पीपीपी' उभारणी
मागील सरकारने बारामतीसह सात ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात त्यासाठी कसलीही तरतूद केली नाही. त्यामुळे त्या ठिकाणची महाविद्यालये उभारताना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीपी तत्त्वावर उभारणी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, मागील सरकारने पायउतार होताना घाईघाईने काही घोषणा केल्या. त्या घोषणा जशा अर्धवट होत्या तसेच त्यातील कामेही अर्धवट राहिली आहेत. राज्यात सात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणा ही त्यापैकीच एक आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या आढावा बैठकीत गोंधळ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी आलेल्या वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. मात्र, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे मंत्र्यांना महाविद्यालयाविषयीची माहिती देण्यात असमर्थ ठरले. त्यामुळे महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांकडूनच मंत्र्यांना माहिती घ्यावी लागली. एक प्रश्न विचारला की ज्याला जमेल त्याने उत्तर द्यायचे या धोरणामुळे विद्यालयातील सावळा गोंधळ समोर आला. बैठकीच्या प्रारंभी अधिष्ठांतांनी माहिती देणे अपेक्षित असते. मात्र, प्राध्यापक संघटनेचे पदाधिकारी डॉ. गणेश ठाकूर यांनीच बैठकीचा ताबा घेत प्राध्यापकांबाबतच्या अडचणी सांगितल्या.