आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिस्थितीच्या वास्तवाचे भान ठेवून लेखकांनी लिहावे; प्रा. यादव गायकवाड यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- लेखक असणं, लेखक होणं, लेखक दिसणं आणि लेखकपण जगणं यातील फरक समजून घेतानाच निसर्गासोबतच सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीच्या  वास्तवाचे भान ठेवून लेखकांनी लिहावे, असे प्रतिपादन पहिल्या एल्गार राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या समारोप आणि पुरस्कार वितरणप्रसंगी नूतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य यादव गायकवाड यांनी सेलू येथे केले.   

सेलूतील साई नाट्य मंदिरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहात पहिल्या एल्गार राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचा समारोप झाला. या वेळी मंचावर संमेलनाध्यक्ष राजन लाखे, गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, जिल्हा परिषद सदस्य राम खराबे पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. ऋतुराज साडेगावकर, अॅड.श्रीकांत वाईकर, कॉ.महेंद्रकुमार गायकवाड, मोहिनी कारंडे, सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती.  

उपप्राचार्य गायकवाड म्हणाले, हाती लेखणी घेणारे आणि श्रम करणारे हात जेव्हा एकत्र येतात तेव्हा एल्गार होत असतो. आजच्या काळात शैक्षणिक क्रांती होण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली.   

गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे म्हणाले, एल्गार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नवा आवाज निर्माण झाला आहे. समतेचा संदेश देणारे हे संमेलन असून आपण शेवटी माणूस आहोत, याची जाणीव या साहित्य संमेलनाने करून दिली.  

संमेलन यशस्वितेसाठी संयोजक सुरेश हिवाळे, सहसंयोजक शरद ठाकर, दिगंबर रोकडे, एकनाथ जाधव, दत्ता रोकडे, रमेश नखाते, प्रा. सतीश मगर, तुकाराम मगर, रामराव गायकवाड, रामराव बोबडे यांच्यासह विविध संस्थांनी पुढाकार घेतला. 

एल्गार साहित्य वैभव पुरस्काराने सन्मान
एल्गार सामाजिक साहित्य परिषदेच्या वतीने  एल्गार साहित्य वैभव पुरस्काराने प्रेमानंद बनसोडे, संतोष नारायणकर यांचा,  एल्गार साहित्य नवचेतना पुरस्काराने जयश्री सोन्नेकर, अशोक अलगोंडी, मोहनी कारंडे यांचा, एल्गार साहित्यरत्न पुरस्काराने रमेश सरकटे, शैलजा कोरडे यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन  सन्मान करण्यात आला. सोबतच एल्गार साहित्य प्रतिभा पुरस्काराचेही या वेळी वितरण झाले. या प्रसंगी पाच शाळांना ग्रंथभेटही दिली गेली. 
बातम्या आणखी आहेत...