आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टील उद्योग संकटात : कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - दोनशे कोटींची मासिक उलाढाल असलेल्या एमआयडीसीत मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. येथील 12 स्टील व 32 रोलिंग मिल्सचे उत्पादन फक्त रात्री 12 तास सुरू ठेवण्याचा निर्णय स्टील असोसिएशनतर्फे शनिवारी आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. रविवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून दोन महिने 12 तासांची एकच शिफ्ट सुरू राहणार आहे. परिणामी 4 हजार कामगार कमी करण्यात आले आहेत.

कॅपिटल ऑफ दि स्टील म्हणून जालना शहराची ओळख निर्माण झालेली आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या उद्योगाकडे बघितले जाते. 15 हजार प्रत्यक्ष व 25 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झालेला आहे. यात कुशल व अकुशल कामगारांचा समावेश आहे. बँकिंग, ट्रान्सपोर्ट, हॉटेल्स, टोलनाका, पेट्रोल-डिझेल पंप, स्पेअरपार्ट, गॅरेज, कापड दुकान यासह विविध छोटे-मोठे व्यवसाय एमआयडीसीवर अवलंबून आहेत. शिवाय, येथील बहुतांश उद्योग स्थानिकांचे आहेत. मात्र, दोन महिन्यांपासून स्टील उद्योग अडचणीत सापडला असून यामुळे 50 लाख ते 1 कोटीचा तोटा सहन करावा लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. उत्पादित मालाला मागणी नसल्यामुळे भाव कमालीचे घसरले आहेत.

मासिक उलाढालीत 100 कोटींची घट
आठ दिवसांपूर्वी येथील 12 कारखानदारांनी फक्त रात्री 12 तास उत्पादन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, उर्वरित 32 रोलिंग मिल्स 24 तास सुरू होत्या. मात्र, वाढता तोटा लक्षात घेऊन रविवारपासून रोलिंग मिल्ससुद्धा फक्त रात्री सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. यामुळे महिन्याकाठी 200 कोटी असलेली उलाढाल 100 ते 120 कोटींवर येणार आहे. शिवाय, कामगारांनासुद्धा आता किमान 2 महिने अन्यत्र काम शोधावे लागेल.

रात्रीचेच काम का ?
उद्योगांना प्रचलित 5 ते 6 रुपये युनिट दराने वीज मिळते. मात्र, रात्रीच्या वेळी उत्पादन केल्यास प्रतियुनिट अडीच रुपयांनी स्वस्त वीज देण्याचा निर्णय झालेला आहे. सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत सवलत लागू आहे. यामुळे जालन्यातील स्टील उद्योजकांनी रात्रीच उत्पादनाचा निर्णय घेतला.

देशभर हीच स्थिती
सध्या पावसाळा सुरू आहे. शिवाय, शासकीय व खासगी स्तरावर कुठेच मोठे प्रकल्प सुरू नाहीत. परिणामी सळईला मागणी नाही. किरकोळ बांधकामांसाठीच सळई वापरली जात आहे. ही स्थिती लक्षात घेता सध्या 2 महिने उत्पादन घटवले आहे. त्यानंतर परिस्थितीत बदल होऊ शकतो, असे वाटते. मुंबई, पुणे येथील उद्योजकांनीसुद्धा उत्पादन घटवल्याचे उद्योजक सतीश अग्रवाल म्हणाले.

तोटा सहन करणे अशक्य
मंदीमुळे महिन्याकाठी एका कारखानदारास 50 लाख ते 1 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही स्टील प्लँटमधील उत्पादन घटवले होते. आता रोलिंग मिल्समधील उत्पादन अध्र्यावर आणले आहे. आता दोन महिने फक्त रात्रीच्या वेळीच कारखाने सुरू राहतील. किशोर अग्रवाल, रूपम स्टील, जालना

ग्राहकांची मागणीच नाही
सध्या मोठी बांधकामे फार क्वचित सुरू आहेत. त्यामुळे ग्राहकांची मागणी नाही. उत्पादन करून ठेवणे परवडत नाही. परिणामी तोटा घटवण्यासाठी रात्री 12 तास उद्योग चालवणे हाच एकमेव पर्याय आहे. सतीश अग्रवाल, संचालक, भाग्यलक्ष्मी स्टील, जालना

कंपनीला 10 कोटींचा फटका
एमआयडीसीत उद्योगांसाठी दरमहा 50 ते 55 मेगाव्ॉट वीज वापरली जाते. यातून वीज कंपनीला 50 ते 55 कोटींचा महसूल मिळतो. मात्र, आता त्यांनी दिवसाचे उत्पादन पूर्णत: बंद केले आहे. यामुळे वीज कंपनीला किमान 10 कोटी रुपयांचा महसूल कमी मिळेल. व्ही. बी. मासूळ, कार्यकारी अभियंता

महागात भंगार खरेदी
स्टील उद्योगांसाठी देश-विदेशातून भंगारची आयात होते. दरम्यान, उद्योजकांनी महागड्या भावात भंगार खरेदी केलेले आहे. जालन्यात आणण्यासाठी येणारा वाहतूक खर्च, त्यावरील प्रक्रिया, यातून तयार होणारी सळई, मार्केटिंग व प्रत्यक्ष ग्राहकांना विक्री हा खर्च लक्षात घेता उत्पादन खर्च मोठा आहे. मात्र, उत्पादित मालाला मागणीच नाही. भाव घसरले व परिणामी उद्योगांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. घनश्याम गोयल, संचालक , कालिका स्टील