आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समितीच्या बैठकीला मुख्याधिकारीच गैरहजर..!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - अर्थसंकल्पातील तरतुदींवर चर्चा करण्यासाठी जालना नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मुख्याधिकारीच या बैठकीला उपस्थित नसल्याने स्थायी समितीची पहिलीच बैठक पुढे ढकलण्यात आली. तत्पूर्वी या बैठकीत अर्थसंकल्पापेक्षा अतिक्रमण हटाव मोहिमवेरच चर्चा झाली. पालिका आणि पोलिस प्रशासन दंडेलशाही करीत असल्याचे सांगत उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी स्वत: अतिक्रमण काढून घेणा-या नागरिकांना अतिक्रमण काढण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली.
जालना नगरपालिकेच्या 2012-13 च्या अर्थसंकल्पीय तरतुदींवर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा पद्मा भरतीया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य आशा ठाकूर, अब्दुल रशीद, शेख मोहम्मद माजेद, शहाआलम खान, रवींद्र अकोलकर, बाबू पवार यांच्यासह पालिका अधिका-यांची उपस्थिती होती. अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असताना, या संदर्भातील संक्षिप्त टिप्पणी सदस्यांना देण्यात आली नव्हती, त्यामुळे नियम 101 नुसार टिप्पणी देण्याची मागणी आशा ठाकूर यांनी केली. मात्र मुख्याधिकारीच उपस्थित नसल्याने प्रशासकीय अधिकारी धर्मा खिल्लारे यांनी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
बैठकीला पालिका मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे हजर नसल्याने हा सभागृहाचा आणि नगराध्यक्षांचा अवमान असल्याचे सांगत बाबू पवार यांनी सभा रद्द करण्याची मागणी केली, तर शहाआलम खान यांनी मुख्याधिका-यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला जावा अशी मागणी केली. विशेष म्हणजे मुख्याधिका-यांनीच ही सभा बोलावली असताना ते कोणतीही माहिती न देता गैरहजर राहिल्याने उपस्थित सर्वांनीच त्याबाबत नगराध्यक्षांना विचारणा केली. परंतु मुख्याधिकारी मनोहरे सभेला उपस्थित राहू शकत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही सभा आता 20 जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभा संपण्यापूर्वी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेत पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून दंडेलशाही केली जात असल्याचा आरोप केला. जिल्हाधिका-यांनी हाती घेतलेल्या या मोहिमेला आपला पाठिंबा आहे, परंतु जे गरीब लोक स्वत:हून अतिक्रमण काढत आहेत, त्यांच्या अतिक्रमणांवर जेसीबी चालवू नका अशा सूचना त्यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिल्या.