आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परळी नायब तहसीलदारांच्या पथकावर जमावाची दगडफेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - तालुक्यातील गडदेवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाच्या कार्डधारकांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या परळीच्या नायब तहसीलदारांच्या पथकावर जमावाने दगडफेक केल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजता घडली. चौकशीसाठी गेलेल्या पथकाला गावातील मंदिराचा एक तास आसरा घ्यावा लागला. शेवटी पोलिस बंदोबस्तात पथकातील अधिकार्‍यांना परळीत नेण्यात आले. गडदेवाडी येथील स्वस्त धान्य दुकान ग्रामस्थांच्या तक्रारीवरून रद्द करण्यात आले आहे.
सदरील दुकान बाहेरील अन्य दुकानास जोडण्यात आले आहे. गुरुवारी दुकानदारांच्या समर्थकांनी दुकान सुरू करावे म्हणून परळी तहसीलसमोर उपोषण केले होते. या वेळी तहसीलदार अतुल जटाळे यांनी मध्यस्थी करत उपोषण सोडवून चौकशीसाठी नायब तहसीलदार बी. एल. रूपनर यांच्यासह तलाठी विठ्ठल पंडित, राहुल चव्हाण, सय्यद सलीम, संदीप राऊत यांच्या पथकाची नियुक्ती केली. हे पथक गुरुवारी दुपारी चार वाजता पोलिसांसह गडदेवाडी गेले. एका जमावाने पथकावर दगडफेक केली. या वेळी गावातील दोन्ही गट समोरासमोर येऊन त्यांच्यात हाणामारी झाली. तेवढ्यात पथकातील अधिकारी मंदिरात सुरक्षित ठिकाणी गेले. पोलिसांनी संपर्क साधून दंगल नियंत्रक पथकाला पाचारण केले. शेवटी पोलिस बंदोबस्तात पथकातील अधिकार्‍यांना परळीला नेण्यात आले. दरम्यान, गावातील दोन्ही गटांनी अंबाजोगाई ठाण्यात दिलेल्या तक्रारींवरून परस्पराविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.