आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाचे गुण मिळविण्यासाठी शाळांनीच मांडला ‘खेळ’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - ‘तुमच्या पाल्याला खेळाचे प्रमाणपत्र पाहिजे असल्यास शाळेत १० हजार रुपये तातडीने आणून द्या,’असे फोन दहावी आणि बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुरू आहेत. याद्वारे शाळांसह क्रीडा संघटनेने प्रचंड मोठा ‘धंदा’सुरू केला असून खेळाचे २५ गुण मिळाल्यास अापल्या मुलांची थेट टॉपमध्ये गणना होणार असल्याने बहुतांश पालकांचा या बाजूनचे कल दिसत आहे. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून आणि खरे खेळाडू बनून गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय सुरू आहे.

शहरातील काही मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनद्वारे पैशाची मागणी होऊ लागली आहे. ‘तुम्ही केवळ १० हजार रुपये लवकर आणून जमा करा,खेळाच्या प्रमाणपत्रांसाठी पुढचं सगळं आम्ही पाहतो,’ असा सल्ला दिला जातो. या नव्या व्यवसायाने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या क्रीडा असोसिएशनकडून विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत सहभागाचे प्रमाणपत्र घरपोच दिले जाते. यामुळे गुणवत्ताधारक पालकांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगून आक्षेप घेतला आहे. खो-खो असोसिएशन, जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन आणि जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने तर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली असून त्यात असे गैरप्रकार थांबवावेत, अशी मागणी केली आहे.

ज्या क्रीडा संघटना अशा प्रकारांमध्ये सहभागी झाल्या असतील त्यांची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून किती गुणवंत खेळाडूंना क्रीडा स्पर्धेपासून वंचित ठेवून खेळाचे ज्ञान नसलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले, याचाही शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
कसे मिळतात खरे गुण
विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये सहभाग नोंदवावा, या भूमिकेतून शासनाने दहावी-बारावीमध्ये विद्यार्थ्यांना २५ गुण ग्रेस म्हणून देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांने शैक्षणिक वर्षामध्ये किमान एका राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांने प्रमाणपत्र दिल्यास त्याला परीक्षा मंडळाकडून दहावी-बारावीमध्ये गुण वाढवून मिळतात.
शासनाच्या धोरणाशी द्रोह
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटण्याचा धंदा म्हणजे शासनाच्या धोरणाशी द्रोह असल्याचे सांगून पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्वत:च्याच नैतिकतेची, शैक्षणिक मूल्यांची प्रतारणा केली असल्याचे खो-खो असोसिएशनने म्हटले आहे.

असे मिळतात खोटे गुण
स्पर्धेत सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळही मिळत नाही. त्यामुळे शासनाने अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कुठल्याही खेळाशी संबंध नसलेल्या आणि अभ्यासात मागे असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी शॉर्टकट शोधत असोसिएशनमार्फत प्रमाणपत्र मिळविण्याचा सपाटा लावला आहे.

असे रोखता येतील प्रकार
ग्रेस गुण वाढीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंची संबंधित खेळाच्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत मैदान कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात यावी, जेणेकरून संबंधित विद्यार्थी हा त्या खेळाचा खेळाडू आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल.

क्रीडा संघटकांकडून दिशाभूल
ग्रेस गुणवाढीसाठी हा व्यवसाय उघडपणे सुरू आहे. यामध्ये काही क्रीडा संघटक पालकांची, शाळांची दिशाभूल करून पैसे कमवित आहेत. या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे. अन्यथा खऱ्या खेळाडूंवर अन्याय सुरूच राहील.
डॉ.चंद्रजित जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन
चौकशी करा
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याची चौकशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत व्हावी, अशी आमची मागणी आहे. तसेच यामध्ये सहभागी असलेल्या क्रीडा संघटना, संस्था, शिक्षण संस्था, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांवर कारवाई व्हावी.
युवराज नळे, अध्यक्ष, उस्मानाबाद जिल्हा टेनिस असोसिएशन
बातम्या आणखी आहेत...