आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर बंद करताना दिसला वाळू टिप्पर, महिला अधिकाऱ्याने मध्यरात्री असा केला पाठलाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी- गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घराचे गेट बंद करत असताना महिला नायब तहसीलदारांना अवैध वाळू वाहतूक करत असलेला एक टिप्पर दिसतो, आपली कार घेऊन त्या मध्यरात्री एकट्याच स्वत: कार चालवत एक किलोमीटरपर्यंत टिप्परचा पाठलाग करतात आणि टिप्परसोबत असलेल्या जीपचालक त्यांनी टिप्पर पकडू नये यासाठी थेट नायब तहसीलदरांच्या कारला धडक देतो. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा थरार गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास आष्टीमध्ये घडला. नायब तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे हे त्या धाडसी अधिकाऱ्याचे नाव.

 

डॉ.वाघमारे या आष्टी तहसीलमध्ये नायब तहसील म्हणून कार्यरत आहेत. आष्टी शहरातील मंगरूळ रोडवरील विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयाच्या परिसरातील माऊली नगरमध्ये त्या किरायाने राहतात. गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास झोपण्याआधी घराचे गेट लावण्यासाठी बाहेर आल्या असता अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर त्यामागे जाणारी एक जीप त्यांना दिसली. डॉ. वाघमारे यांनी तत्काळ आपल्या खासगी कारने (एमएच १२ ईएक्स १९००) ड्रायव्हिंग करत टिप्परचा पाठलाग सुरू केला. त्यांनी मंगरूळ रोडने या जीप टिप्परचा पाठलाग केला. दरम्यान, जीप चालकाने (एमएच १६ एटी ३६५१) वाघमारे यांच्या कारला पुढे जाऊ दिले नाही. डॉ. वाघमारे यांनी अनेकदा हॉर्न वाजवून साईड देण्याची सूचना केली मात्र जीपचालकाने वेग कमी करत त्यांना अडथळा आणला.

 

आष्टी पोलिसांत गुन्हा
कारला धडक दिल्याप्रकरणी अज्ञात कारचालकावर आष्टी पोलिसांत डॉ. क्षितिजा वाघमारे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश कुमार पाटील हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. कारला जीपने धडक दिल्याने कारचे नुकसान झाले आहे.नायब

 

एकट्या असूनही टिप्परचा पाठलाग
जीप चालकाने नायब तहसीलदार डॉ. वाघमारे यांच्या कारला जीप आडवी लावून टिप्पर चालकाला पळून जाण्यास वेळ दिला. हा टिप्पर खडकत रोडने गेला तरीही वाघमारे यांनी आपली कार वळवून त्याना पाठलाग सुरुच ठेवला. गस्त घालणारे पोलिस आल्यानंतर वाघमारे यांनी पाठलाग थांबवला मात्र टिप्परचालक आणि जीपचालक दोन्ही पळून जाण्यात यशस्वी झाले पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याही हाती हे दोघे लागले नाहीत.

 

पोलिसांना दिली माहिती
जीपचालक जाणीवपूर्वक आपल्याला अडवत असल्याची खात्री पटताच नायब तहसीलदार डॉ. वाघमारे यांनी गाडी चालवत असताना आष्टी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना या प्रकाराची माहिती दिली.

 

कारला धडक दिल्याने पळाले
टिप्पर चालक अवैध वाळू वाहतूक करत असल्याने त्याच्यावर कारवाईसाठीच पाठलाग केला होता. कारमध्ये मी एकटीच होते. मात्र कारला धडक दिल्याने कारवाई करता आली नाही. वाळूमाफियांवर यापुढेही कडक कारवाई करू.
- डॉ.क्षितिजा वाघमारे, नायब तहसीलदार, आष्टी

बातम्या आणखी आहेत...