आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लावणी महाेत्सवाची रंगत, चव्हाणांनी सपत्नीक आनंद लुटला, रात्री उशिरापर्यंत फड रंगला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - माळेगाव यात्रेतील लावणी महोत्सवाचा मंगळवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी सपत्नीक लावण्यांचा आनंद लुटला. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा स्वामी, आमदार वसंतराव चव्हाण, अमर राजूरकर, प्रताप पाटील चिखलीकर हेही लावण्यात दंग झाले.

लावणी महोत्सवाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उद्घाटन केले. खासदार अशोक चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उधळीत येरे गुलाल सजना, येळकोट येळकोट जय मल्हार या गीतानंतर पिंजऱ्यामधी प्रीतीचं आलं पाखरू, चांदण्या रातीला, तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा, लाल पैठणी रंग माझ्या चोळीचा, तुम्ही यावं सजना रंग होळीला, सोडा सोडा राया आता नाद खुळा, झोंबतो गारवा, यो यो पावणा मंुबईचा मेव्हणा अशा एकापेक्षा एक बहारदार लावण्यांनी नृत्यांगनांनी लावणी शौकिनांना खिळवून ठेवले. अमिता चव्हाण यांनीही अनेक लावण्यांवर टाळ्या वाजवून खुली दाद दिली. महोत्सवात श्री गणेश लोकनाट्य मंडळ वारंगा फाटा, साईनाथ लोककला केंद्र भोकर फाटा, विद्या काळे व संच, श्यामल सुनील लखणगावकर व संच, वैशाली वायफळेकर व संच, आशा-रूपा परभणीकर व संच व सुरेखा पुणेकर यांनी महोत्सवात लावणी नृत्य सादर केले. या रावजी बसा भावजीपासून ते जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा या लावणीपर्यंत रसिकांनी माळेगाव यात्रेत लावणीचा मनसोक्त आस्वाद लुटला.
माळेगाव यात्रेवरून परतणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू
परभणी | गंगाखेड-परळी राज्यमार्गावरील निळा पाटी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत परभणीतील दोघे जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. ते दोघे माळेगाव यात्रेवरून मोटारसायकलद्वारे परतत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. परभणी येथील सुरेश मारोतराव रासवे (२४) व भागवत सखाराम खुणे (३०) हे दोघे माळेगाव यात्रेसाठी सोमवारी सकाळी गेले होते. ते दोघे मोटारसायकलने माळेगाव येथून परळीमार्गे रात्री उशिरा परभणीकडे परतत होते. परळी-गंगाखेड रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच मृत्यू पावले. नातेवाइकांना ही माहिती कळताच त्यांनी मंगळवारी पहाटे घटनास्थळी धाव घेतली. यातील सुरेश रासवे यांचा सात महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गंगाखेड पोलिस तपास करीत आहेत.

पत्रकारांचा बहिष्कार
माळेगाव यात्रेत मंगळवारी आयोजित करण्यात आलेला लावणी महोत्सव पत्रकारांच्या बहिष्काराने चांगलाच गाजला. आसन व्यवस्था योग्य पद्धतीने केली नसल्याने पत्रकारांनी घोषणाबाजी करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. पत्रकारांची मंचासमोर महिलांच्या मागे भारतीय बैठक पद्धतीने व्यवस्था करण्यात आली. मंचावरून ही व्यवस्था दूर असल्याने पत्रकारांना काहीही दिसत नव्हते.