आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकरसंक्रांतीच्या करीला भरणारी तामसा येथील भाजी-भाकरी यात्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग देवस्थानातील भाजी-भाकरीची यात्रा मराठवाड्यातच नाही तर विदर्भ, कर्नाटक, तेलंगणातही प्रसिद्ध आहे. या यात्रेला १५२ वर्षाची परंपरा आहे. मकर संक्रातीच्या करीला (दुसऱ्या दिवशी) यात्रेच्या निमित्ताने एक लाखाहून अधिक भाविक यात्रेसाठी येतात. येथील महत्त्व पाहून तीर्थक्षेत्राला शासनाने क दर्जा दिला आहे.

तामसा गावापासून नैऋत्येला २ कि.मी. अंतरावर बारालिंग महादेवाचे प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. मंदिरात पाच फूट भुयारात काळ्या पाषाणात कोरलेले शिवलिंग आहे. बाहेर गाभाऱ्यात महादेवाची बारा लिंग पाषाणात कोरलेली आहेत. त्यासमोरच नंदी आहे. मंदिराचे खांब पाषाणाचेच असून त्यावर कोरीव काम आहे. या मंदिराच्या पूर्वेलाच गौतम मंदिर आहे. गौतम ऋषीचे तेथे वास्तव्य होते, असे सांगितले जाते.

भाजी-भाकरीची सुरुवात
या मंदिराचे पुजारी महादलिंग महाराज कंठाळे यांच्या पूर्वजांनी भाजी-भाकरीची परंपरा सुरू केली. त्या वेळी रानातील झाडाची पाने, फळे, केळी, कंदमुळे गोळा करून भाजी बनविण्यात येत असे. त्यासाठी १५ दिवस अगोदरपासून तयारी केली जात असे. परिसरातील केवळ ३०-४० लोकच प्रसादाला हजर राहत. आता यात्रेचा व्याप वाढला. त्यामुळे भाजी-भाकरीची पद्धत बदलली. यात्रेसाठी तामसा येथे एक आठवडी बाजार भरविला जातो. त्या बाजारातील सर्व भाज्या एकत्र करून यंत्राची मदत घेऊन त्या चिरल्या जातात. गुऱ्हाळावरील दोन मोठ्या कढयामध्ये जवळपास ७०-८० क्विंटल भाजी शिजविली जाते. आजूबाजूच्या गावात रोजंदारी पद्धतीने भाकरी बनविण्याचे काम दिले जाते. ६०-७० क्विंटल ज्वारीच्या भाकरी यात्रेसाठी गावागावांतून तयार करून आणल्या जातात. देवस्थान कमिटीने गर्दी लक्षात घेऊन पंगत पद्धत बंद केली. आता प्रत्येक भाविकाला एक भाकर, भाजी प्रसाद म्हणून दिली जाते. यात्रेची परंपरा पाहून शासनाने देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा क दर्जा दिला आहे.

आख्यायिका
प्रभू रामचंद्र जेव्हा १४ वर्षे वनवासात होते तेव्हा ते गौतम ऋषींच्या कुटीत वास्तव्याला होते. सीतेला जेव्हा भूक लागली तेव्हा गौतम ऋषींनी याच परिसरातील जंगलातून मिळेल तो भाजीपाला, कंदमुळे, रानमेवा आणून सीतेची भूक भागविली. गौतम ऋषीच्या विनंतीवरूनच रामचंद्रांनी जमिनीत बाण मारून पाणी काढले. ज्या ठिकाणी बाण मारून पाणी काढले त्या जागेवर १० फूट खोलीचे कुंड बांधून त्याला रामकुंड व जागेला गौतम तीर्थ असे नाव देण्यात आले. उन्हाळ्यातही या कुंडाचे पाणी आटत नाही.