आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धैर्याने लढणार्‍या सुरेखाचा डॉक्टर होण्यासाठी संघर्ष सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील अठराविश्वे दारिद्र्यावर मात करताना कोणतीही शिकवणी न लावता तिने दहावीच्या परीक्षेत केवळ गुणवत्तेच्या बळावर तब्बल 95 टक्के गुण मिळवले. परिस्थितीने गांजलेल्या आई-वडिलांना संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाण्याचा संदेश दिला. पुढील संकटावर मात करून वैद्यकीय शिक्षण घेत डॉक्टर होण्याची जिद्द बाळगणार्‍या बीडच्या सुरेखाला आता पुढील शिक्षणासाठी गरज आहे, ती आर्थिक पाठबळाची !
बीड -बीड तालुक्यातील काळेगाव हवेली या दारूबंदीसाठी लढा उभारणार्‍या निभर्यी महिलांच्या गावातील कुंभार समाजातील संगीता आणि बद्रीनारायण या दांपत्याचे शिक्षण जेमतेमच झालेले ! प्रापंचिक अडचणींवर मात करतानाच मुलगी शालेय शिक्षणातच हुशारीची चुणूक दाखवू लागली.

आपल्याला शिकता आले नाही, किमान सुरेखाचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करावे यासाठी या दांपत्याने मिळेल ती कामे करून तिला दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. तिनेही आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करून दाखविले.

आता लाडक्या लेकीला डॉक्टर करण्यासाठी पुढील शिक्षण द्यावे लागणार आहे, यासाठी काय करावे, असा प्रश्न मोटारकर दांपत्याला सतावत असून समाजातील दानशूरांनी तिच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे. बीड तालुक्यातील काळेगाव हवेली येथे या कुटुंबाची वडिलोपार्जित तीन एकर शेती. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीत काबाडकष्ट करतानाच दुसर्‍यांच्या शेतात मोलमजुरी करून ते प्रपंच करत राहिले. त्यांना दोन मुले, एक मुलगी आहे. मुलगी सुरेखाचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले.

पुढील शिक्षण बीड शहरातील राजर्षी शाहू कन्या विद्यालयात आठवीच्या वर्गात प्रवेश घेतला. दहावीत गेल्यावर शिक्षकांनी शाळेतील अभ्यासक्रम व शाळेतील चार सराव परीक्षांमुळे परीक्षेचे दडपण कमी झाले. मुलीने दहावीत शाळेतून पहिली यावे अशी इच्छा होती त्यानुसार घरी गेल्यावर दुपारी पाच ते रात्री बारापर्यंत, तर कधी पाच तास अभ्यास करून परीक्षेची तयारी केली. निकालाच्या दिवशी शाळेतून 95 टक्के घेत पहिला क्रमांक मिळवल्याचे शिक्षकांनी सांगितल्यानंतर कष्टाचे चीज झाल्यामुळे कुटुंबात आनंद पसरला ! या दिवशी घरात अक्षरश: दिवाळीच साजरी झाली, असे सुरेखाने सांगितले.
मुलींच्या शिक्षणावर भर
आमच्या विद्यालयास 25 वर्षे पूर्ण होत आहेत. मुलींच्या गुणवत्ता वाढीसाठी सन 1995 पासून शाळेच्या तासिकेसह मोफत उन्हाळी वर्ग, दहावी बोर्डानुसार दिवाळीनंतर चार सराव परीक्षा घेतल्या जातात. अन्य उपक्रमांत मुलींना सहभागी करून घेत शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. सुरेखाने मिळविलेल्या यशाचा आम्हाला अभिमान वाटतो.’’
एस. डी. कदम, मुख्याध्यापक, राजर्षी शाहू कन्या विद्यालय, बीड
शिक्षणासाठी शेती विकणार
मला साडेतीन एकर शेती आहे, परंतु सुरेखाच्या शिक्षणासाठी शेती विक्रीस काढणार आहे. माझी मुलगी डॉक्टर व्हावी ही आमच्या कुटुंबाची इच्छा आहे. सध्याही मजुरी करतो. आमच्या कुटुंबात व गावात दहावीत 95 टक्के मिळवणारी पहिली मुलगी आहे. दानशूरांनी तिच्या महाविद्यालयीन शिक्षणास मदत दिली, तर पुढील वैद्यकीय शिक्षणात ती यश मिळवेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.’’
बद्रीनारायण मोटारकर, सुरेखाचे वडील
डॉक्टर होण्याचे स्वप्न
माझे वडील शेतकरी आहेत, आमच्या कुटुंबात शिक्षण घेणार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळे मुलीने डॉक्टर व्हावे, अशी इच्छा त्यांची आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच मला यश मिळाले आहे. पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.’’
सुरेखा मोटारकर, विद्यार्थिनी