आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Struggle Reflaction Come Into Literature Priciple Dr.Sandhya Dudhagoankar

संघर्षाचे प्रतिबिंब साहित्यात असावे - प्राचार्या डॉ. संध्या दुधगावकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : समारोप कार्यक्रमात प्राचार्या डॉ. संध्या दुधगावकर.
जालना - साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो. जीवनमूल्य, नीतिमूल्य व अंतरात्म्याचा हुंकार यात असतो, म्हणून ते रसिक मनाला जास्त भावते. समाजातील परिवर्तन यात रेखाटले जाते. यामुळे जीवन संघर्षाचे प्रतिबिंब साहित्यात असावे तरच ते साहित्य चिरंतन टिकते, असे मत प्राचार्या डॉ. संध्या दुधगावकर यांनी व्यक्त केले. मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात रविवारी आयोजित ६ वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन समारोपात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्षा प्राचार्या डॉ. छाया महाजन होत्या. मंचावर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, प्रा. दादासाहेब गोरे, कुंडलिक अतकरे, स्वागताध्यक्षा शकुंतला कदम, संजीवनी तडेगावकर, प्राचार्या सुनंदा तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती. दुधगावकर म्हणाल्या, अवती-भोवतीच्या घटनांचा लेखाजोखा साहित्यातून उमटत असतो. परिवर्तनाचा धागा रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम साहित्य करते. यामुळे रसिकही परिवर्तनाची फळे चाखतो. यातूनच परिवर्तनाचा साक्षीदार व भागीदार होण्याची संधी मिळत असते. समाजाला जिवंत ठेवण्यासाठी साहित्य निर्मिती होत असते, असेही दुधगावकर म्हणाल्या.

संमेलनात ३ ठराव संमत
१. आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या वारसांच्या उच्च शिक्षणाचा खर्च राज्य शासनाने उचलावा.
२. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयासाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी.
३. जालना शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधावीत. (संजीवनी तडेगावकर, अनुमोदक सीमा खोतकर)

विशेष प्रावीण्यप्राप्त व्यक्तींचा करण्यात आला सत्कार
साक्षी क्षीरसागर (बास्केटबॉल खेळाडू), प्रियंका सातपुते (छायाचित्रकार व लघुपट) संजीवनी डहाळे (छायाचित्रकार), राेहिणी पाष्टे (फुटबॉल खेळाडू), रेखा जाखोटे (वार्ली पेंटिंग), प्रिया सुरडकर (सलग ७९ तास मेंहेंदी काढण्याचा विक्रम) यांचा मान्यवरांनी सत्कार केला. तसेच साहित्य संमेलनानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी, निंबध स्पर्धांमध्ये यश मिळवणा-या शाळा व विद्यार्थी, संमेलनस्थळी उत्कृष्ट रांगोळी काढणे, नियोजन करणे यात सहभागी असलेल्या सर्वांचा गौरव करण्यात आला.

व्यवस्थेविरोधात लढण्याचे काम स्त्रीने आतापर्यंत केले आहे. त्यामुळे तिला कोणी कमी समजू नये. शेतकरी चळवळीत काम करत असताना अनेकदा तुरुंगात जावे लागले. पण शेतक-यांच्या हक्कांसाठी केलेला लढा समाधान देणारा आहे.
शैला देशपांडे

विषम समाजव्यवस्थेमुळे स्त्रियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कठीण अवस्थेतही स्त्रीने आपले जीवन घडवावे, आपल्या क्षमतांचा समाजासाठी वापर करावा.
सुनीता आरळीकर

स्त्रियांनी पूर्णपणे स्वावलंबी व्हावे. स्वावलंबनामुळे आत्मभान येते. मन तयार असेल तर जगातील कुठलीही गोष्ट करणे अवघड नाही. वाचन सुरू ठेवावे. पुस्तक आपल्याला अधिक सक्षम बनवितात.
दुमती जोंधळे

आजही पुरुषांच्या तुलनेत सहापट अधिक काम केल्यावरच स्त्रीला बरोबरचे समजले जाते. स्त्रियांनी वैचारिक क्षेत्रात काम करावे, म्हणजे त्यांच्यावर येणा-या मर्यादा निश्चितच गळून पडतील. प्राचार्या डॉ.सुनंदा तिडके

स्त्रियांनी न्यूनगंड झटकून टाकावा. पालकांनी योग्य निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य द्यावे. इतरांना काय वाटते यापेक्षा आपल्याला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. हे लक्षात ठेवून काम करावे .
प्रेरणा देशभ्रतार

अनुभव कथनाला गर्दी
संमेलनाध्यक्षा डॉ.छाया महाजन, स्वागताध्यक्षा शकुंतला कदम, रेखा बैजल, संजीवनी तडेगावकर, डॉ.संध्या दुधगावकर, वसुधा देव, डॉ.स्नेहल पाठक यांच्यासह लेखिका, लेखक, साहित्य क्षेत्रातील मान्यवर व शहरातील नागरिकांची अनुभव कथनाला उपस्थिती होती. नाट्यगृह गर्दीने फुलले होते.