आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी 17 लाख पुस्तकांची यंदा मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - उन्हाळीसुट्या सुरू होण्यापूर्वीच शालेय साहित्याची खरेदी करण्याची लगबग शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत वाटपाच्या पाठ्यपुस्तकांची नोदणी केली जात आहे. बालभारतीकडून आलेली पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वीच संबंधित शाळांवर पोहोचविले जाणार आहेत. त्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १७ लाख पाठ्यपुस्तके आणि लाख स्वाध्याय पुस्तिकांची बालभारतीकडे नोंदणी करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने हे नियोजन केले आहे.

मराठवाड्यातील सर्व शाळांना मे रोजी पासून ते १५ जूनपर्यंत सुटी दिली जाते. या दरम्यान शिक्षकांकडे शालेय प्रवेशाची लगबग सुरू असते. त्याशिवाय प्रवेश वाढावेत मुलांची उपस्थिती राहावी म्हणून जून महिन्यात प्रवेश पंधरवडा अभियान राबविले जाते. पहिलीत बालवाडीत प्रवेश घेणाऱ्या लहान मुलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे, त्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दिवशी पाठ्यपुस्तके मोफत वाटप करणे हा उपक्रम राबविण्यात येताे. या सर्व गडबडीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यासाठी दरवर्षीच उशीर होतो. या वर्षी मात्र असे प्रकार होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक वर्ष संपत असतानाच आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने बालभारतीकडे करण्यात आली आहे. या पूर्वतयारीमुळे ही पुस्तके लवकरच उपलब्ध हाेतील आणि शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळतील, असा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तालुकास्तरावरून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आली आहे. मागणीनुसार छपाई करून आलेली ही पुस्तके प्रथम जिल्हास्तरावर प्राप्त होतील. त्यानंतर ती तालुका स्तरावर वाटप केली जाणार आहेत.


कामांची गती वाढली
सर्वकाही ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने कामांची गती वाढली आहे. बालभारतीकडे आता पुस्तकांची नोंदणीही ऑनलाइन केली असल्याने पुस्तके वेळेत उपलब्ध होतील. शिवाय वेळेत विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास नक्कीच मदत होईलङ शिवाय शाळास्तरापर्यंत वितरण प्रक्रियाही सुरळीत होईल.
- पी.आर.जाधव,गटसमन्वय अधिकारी, जालना.
जूनमध्ये पुस्तके उपलब्ध
जितक्यालवकर शिक्षण विभागाकडून बालभारतीकडे नोंदणी केली जाते तितक्या लवकर ही पुस्तके उपलब्ध केली जातात. या वर्षी मात्र आॅनलाइन पद्धतीनेच पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आल्याने जून महिन्यातच पुस्तके प्राप्त होतील अशी शक्यता आहे. पहिल्याच दिवशी पुस्तके वितरित केल्यास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या प्रमाणातही वाढ होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.