आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्‍ये हॉलतिकीट न मिळाल्याने विद्यार्थ्‍याची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - बीएस्सी प्रथम वर्षाच्या पुरवणी परीक्षेचे हॉलतिकीट न मिळाल्याने लातुरात गुरुवारी विष प्राशन करून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. नरेश संतोष केरुरे (20, रा. लेबर कॉलनी, लातूर) असे आत्महत्या करणा-या विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात महाविद्यालयाला दोषी धरले आहे. दरम्यान, नरेशच्या आत्महत्येस जवाबदार धरून बसवेश्वर महाविद्यालयातील क्लार्क ए. डी. जाधव यांच्यावर गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे.


नरेश बीएस्सी द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. वडील रिक्षाचालक, तर आई गृहिणी असून तो एकुलता होता. नरेश प्रथम वर्षाच्या काही विषयांत अनुत्तीर्ण झाला होता. ही परीक्षा 21 जूनपासून चालू होणार होती. त्याचे हॉलतिकीट घेण्यासाठी तो 19 जून रोजी महाविद्यालयात गेला होता. त्याने संबंधित विभागाचे कारकून ए. डी. जाधव यांच्याकडे हॉलतिकिटाची मागणी केली; परंतु विद्यापीठाकडून हॉलतिकीट आले नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे तो नाराज होऊन घरी परतला. त्यानंतर त्याने संध्याकाळी सात वाजता एका खोलीत विष प्राशन करून चिठ्ठी पँटच्या खिशात ठेवली. उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईक, मित्र आणि शेजारील जवळपास 200 जणांचा समुदाय रुग्णालयात जमला. संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता.


आई-बाबा, मी टॉर्चर
झालो असतो!

माझ्या पॉयझन खाण्याचे कारण कोणी नसून माझे शिक्षणच आहे.
मी फीस भरलेली असतानाही माझे हॉलतिकीट आले नाही. का आले नाही म्हणून विचारायला गेलो असता क्लार्क नीट बोलत नव्हता. मी जर ही परीक्षा फेल झालो असतो तर मला खूप टॉर्चर झाले असते आणि मी आई-वडिलांच्या नजरेतून उतरलो असतो. म्हणून मी ही पद्धत स्वीकारली. जर देव नावाची व्यक्ती वर असेल तर त्याला नक्कीच विचारीन की, त्याला मीच का सापडलो? माझे नशीबच का खोटे? मला जगायचं होतं आणि आयुष्यात खूप काही करायचं होतं; पण त्यानं मला इतकी डेअरिंग का दिली नाही? मी माझ्या आई-वडिलांना जाऊन का सांगू शकत नाही की, मी नापास झालो म्हणून. मला परीक्षा देण्याची लास्ट संधी होती; पण क्लार्कमुळे ती गेली. त्या देवाला सर्व विचारीन की, त्याला मीच का सापडलो? मला आज विष खाताना नको वाटत होतं; पण काय करणार? माझं नशीबच वाईट. आयुष्यात खूप काही बनायचं होतं; पण काय करावं, माझ्या नशिबाने सर्वकाही माझ्यापासून हिरावून घेतलं. वर्षभर प्रॅक्टिस केली; पण नशीब नाही आले. पोलिस भरती गेली. नवीन प्रॅक्टिस करून उभं राहावंसं वाटलं; पण काय करावं, शिक्षणाची भीती. त्यानं जगू दिलं नाही. आई-वडिलांना आज सोडून जायचं नव्हतं; पण काय करावं; त्याला नशिबाची खोट...पण मी नक्कीच विचारीन त्याला, मीच का सापडलो.
नरेश केरुरे
(आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी नरेशच्या शब्दांत)


नरेशला परीक्षा देता आली असती...
विद्यापीठाकडूनच नरेशचे हॉलतिकीट आले नव्हते; परंतु संबंधित क्लार्कने त्याच दिवशी विद्यापीठाशी संपर्क साधून त्वरित पाठवण्यास सांगितले होते. गुरुवारी नरेशला हॉलतिकीट घेण्यासाठी बोलावले होते; परंतु दुर्दैवाने त्याने टोकाचे पाऊल उचलले. नरेशला माझ्या पत्रावर परीक्षा देता आली असती. -डॉ. नागोराव कुंभार, प्राचार्य, महात्मा बसवेश्वर


चूक कोणाची यापेक्षा घडलेली घटना दुर्दैवी आहे.

हॉलतिकीट देण्यात विद्यापीठाकडून दिरंगाई झाली की, महाविद्यालयाची चूक होती, याची संबंधित विभागाकडून माहिती घ्यावी लागेल. मात्र, प्राचार्यांच्या पत्रावरही परीक्षा देता आली असती.
डॉ. दिलीप उके, प्रभारी कुलगुरू, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ