भूम- तालुक्यात भूम पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने १ जुलैपासून “”मिशन ९० दिवस’ उपक्रम राबवून आतापर्यंत तालुक्यातील २३ गावांमध्ये उघड्यावर शौचाला बसणाऱ्या ४०६ लोटाप्रेमींवर कारवाई करून ८१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, २३ लोटाप्रेमींना विद्यार्थ्यांसमोर हजर करून २०० रुपये दंडासह परिसर स्वच्छतेची शिक्षा सुनावण्यात आली.
१३ जुलैला मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी जिल्ह्यातील पंचायत समित्यांना विद्यार्थी अदालती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पथकाने त्या-त्या गावातील शाळांमध्ये विद्यार्थी अदालत भरवून त्यांच्यामार्फत लोटाप्रेमींना गाव, मंदिर व शाळेचा संपूर्ण परिसर झाडण्याची शिक्षा देण्यात आली. आपल्याच मुलांसमोर अपमान होत असल्याने कारवाई केलेल्या ४०६ पैकी ३५० लोटाप्रेमींनी शौचालयांच्या उभारणीची तयारी चालवली आहे. १४ जुलैला तालुक्यातील दांडेगाव येथे पहिली अदालत घेण्यात आली.
२३ लोटाप्रेमींना विद्यार्थ्यांसमोर हजर करून २०० रुपये दंडासह परिसर स्वच्छतेची शिक्षा सुनावण्यात आली. याचा धसका घेऊन शौचालये नसलेल्या ३६ कुटुंबांनी ३० शौचालयांचे त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत खड्डे घेऊन बांधकामाला सुरुवात केली. १५ ते १८ जुलै दरम्यान सुकटा, भवानवाडी, पाडोळी या गावांमध्ये अदालत घेण्यात आली. येथील लोटाप्रेमीही शौचालय उभारणीच्या तयारीत लागले आहेत. ही विद्यार्थी अदालत तालुक्यात नावीन्यपूर्ण आहे.
इट : लोकप्रतिनिधींच्या गावामध्ये सर्वात कमी शौचालये
उस्मानाबाद जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘मिशन ९० डेज’ राबविण्यात येत आहे. यासाठी शासकीय अधिकारी टार्गेटनुसार काम करत आहेत. परंतु भूम तालुक्यात आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची १५ गावे अद्यापही दुर्गंधीमुक्त झालेली नाहीत.
हागणदारीमुक्तीसाठी प्रशासनाकडून परिश्रम घेण्यात येत आहेत. दररोज २-३ गावांमध्ये गुड मॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आमदार राहुल मोटे यांच्या गिरवली गावामध्ये केवळ ३३९ पैकी ११० शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. सुकटा गणाच्या जिल्हा परिषद सदस्या छायाताई कांबळे यांच्या वरूड गावात २५० पैकी फक्त ७१ कामे पूर्ण झाली. याच गणात पंचायत समिती सदस्य बाजीराव तांबे यांच्या देवळाली गावामध्ये ५४८ पैकी ३९० कामे बाकी आहेत. सुकटा गटातील पंचायत समिती सदस्या मैनाबाई भंडके यांच्या सुकटा गावात ७१२ पैकी केवळ ४०५ कामे झाली आहेत.
नांदेड शहर, परिसरातील ४० लोटेबहाद्दरांवर गुन्हा, दहा जणांना २१०० रुपयांचा दंड
नांदेड वाघाळा महानगरपालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या चार झोनमध्ये मागील तीन दिवसांत गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्या ४० जणांना पकडले. या सर्वांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील १० जणांना न्यायालयाने २१०० रुपये दंड ठोठावला असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र धरतीवर उघड्यावर शौचालयास जाण्यासाठी शासनाने कायदेशीर बंदी घातली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना अनेकदा आवाहन करण्यात आले होते. यासाठी शासनाकडून शौचालय बांधण्यासाठी अनुदानही देण्यात आले. मात्र, अनेक नागरिकांनी अनुदान घेऊनही शौचालयाचा वापर करत नसल्याने ते उघड्यावर जात आहेत. यासाठी महापालिकेने गुडमॉर्निंग पथकाची स्थापना केली होती. या पथकाने शहरातील तीन दिवसांत ४६० जणांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. यातील १० जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ३००, २०० व १०० रुपये असा दंड लावला.
शौचालय उभारणीसाठी अनुत्सुकता
शासनाने ग्रामीण भागामध्ये शौचालयासाठी अनुदान ठेवले असून १०० टक्के हागणदारीमुक्त होणाऱ्या गावाला विशेष पुरस्कार दिला जात आहे. तरीही ग्रामीण भागातील ग्रामस्थ शौचालय बांधकामासाठी पुढाकार घेत नाहीत. महापालिका हद्दीत येणाऱ्या ग्रामीण भागातही गुड मॉर्निंग पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.