आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' खून प्रकरणातून विद्यार्थी निर्दोष मुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- परतूर तालुक्यातील वरफळ येथे जुलै २०१३ रोजी युवकाचा खून करण्यात आला होता. यात खुनाच्या गुन्ह्यासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये विद्यार्थ्यास अटक करण्यात आली होती. येथील प्रमुख न्यायदंडाधिकारी (बाल न्यायमंडळ) न्या. जा. सु. भाटिया यांनी यातील विद्यार्थ्याची निर्दोष मुक्तता करून विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

परतूर-सेलू रस्त्यावर चिंचोली वरफळ गावाजवळ असलेल्या नाल्यात पारधी समाजातील वीसवर्षीय युवकाचा मृतदेह पाण्यात सापडल्याची माहिती पोलिस पाटील ज्ञानोबा ढवळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी ही बाब परतूर पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर या युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास पोलिस निरीक्षक बोलकर यांच्याकडे सोपवण्यात आला.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून एका (विधिसंघर्षग्रस्त बालक) विद्यार्थ्यास ताब्यात घेतले होते. मात्र, या गुन्ह्यात प्रथम खबर देणारी मृताची आई वंदनाबाई पांडुरंग काळे यांनी पोलिसांना सांगितले की, सय्यद आरेफ सय्यद रज्जाक याने आपल्या मुलाला दोन-तीन दिवसांपूर्वी रेल्वेस्थानकाजवळ शिवीगाळ करून धमक्या दिल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी सय्यद आरेफ सय्यद रज्जाक यासही अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले होते. मात्र, या प्रकरणी शासकीय निरीक्षणगृहात असलेल्या विद्यार्थ्याचा या खुनाशी कसलाही संबंध नाही, ही बाब विद्यार्थ्याचे वकील अरविंद मुरमे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत त्याबाबतचे पुरावेही सादर केले.

शिक्षणाचा मार्ग मोकळा
बालन्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकारी जा. सु. भाटिया यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एेकल्यानंतर विद्यार्थ्याची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करून तो ज्या शाळेत शिक्षण घेत आहे, त्या शाळेला विधिसंघर्षग्रस्त बालक (काळजी संरक्षण) अधिनियम कायद्यान्वये दिल्यामुळे विद्यार्थ्याला पुढील शिक्षण घेण्याचाही मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती अॅड.अरविंद मुरमे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...