आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोलीत जातीत बदल केल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची जात कोळी असताना उतार्‍याच्या रकान्यात महादेव कोळी करण्यात आल्याप्रकरणी 23 ऑगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील जात बदलण्यात आलेल्यांपैकी एका व्यक्तीच्या 24 वर्षीय मुलाने सकाळी साडेसहा वाजता फाशी घेऊन आत्महत्या केली, तर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सामाजिक न्यायमंत्र्यांचे जावई तथा आदिवासी युवक कल्याण संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष टारफे यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ब्राह्मणवाडा येथील शाळेतील मुंजाजी विठोबा विभुते व इतर 20 अशा एकूण 21 विद्यार्थ्यांच्या उतार्‍यामध्ये जातीच्या रकाण्यात ‘कोळी’ असा उल्लेख असताना अज्ञात आरोपीने त्यामध्ये ‘महादेव कोळी’ असा बदल केला. महादेव कोळी ही जात अनुसूचित जमाती प्रवर्गात येते. यामुळे अनुसूचित जमातीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठीच हा बदल करण्यात आल्याचा आरोप आदिवासी युवक कल्याण संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष टारफे यांनी केला होता. याबाबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किशोर पालेवार व जात बदलणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. ज्यांच्या नावासमोरील जात बदलण्यात आली होती ते मुंजाजी विभुते एसटी आगारामध्ये वाहन निरीक्षक म्हणून सेवेत आहेत.

आपल्या वडिलांची नोकरी जाणार या भीतीपोटी विभुते यांचा 20 वर्षीय मुलगा राजू याने गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गावाजवळील एका ओढय़ाच्या काठावरील झाडाला फाशी घेऊन जीवन संपविले. यामुळे कोळी समाजाचे नेते नागनाथ घिसेवाड व समाजबांधवांनी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला होता. शेवटी मयताची पत्नी रुख्मिणी विभुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलिसात डॉ. संतोष टारफे, आदिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते आणि कृष्णा पिंपरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलिस उपअधीक्षक नीलेश मोरे, औंढय़ाचे पीआय विजय जोंधळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी फरार झाले आहेत.

कोळी आणि महादेव कोळी यामधील फरक
महादेव कोळी ही जमात आदिवासी प्रवर्गात आहे, तर कोळी ही जात भटक्या जातीमध्ये येते. भटक्या जातीमध्ये इतर जातींचीही संख्या मोठी असल्याने धनगर व बनगी धनगर सारखाच कोळी व महादेव कोळी यातील नामसाधर्म्याचा फायदा घेऊन अनुसूचित जमातीचे सरकारी आरक्षण व इतर लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.
प्रकरण गंभीर असल्याने आरोपींना अटक होणारच
‘प्रकरण गंभीर असल्याने गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक होणार आहे. यामध्ये राजकीय दडपण वगैरे बाबींना काहीही स्थान नसून पोलिस कायद्याप्रमाणे आपले काम करीत आहेत. यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नाही हे स्पष्ट आहे.’
- विजय जोंधळे, पीआय, औंढा नागनाथ.
महादेव कोळी जात हिंगोली जिल्ह्यात नाही
हिंगोली जिल्ह्यामध्ये महादेव कोळी या आदिवासी प्रवर्गातील जातीचे लाभार्थी आढळत नाहीत. एखादा लाभार्थी असलाच तर तो अहमदनगर, कोकण किंवा मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून आलेला असतो. शिवाय ब्राह्मणवाडा गावातील कोळी हे महादेव कोळी या आदिवासी प्रवर्गातील नाहीतच. त्यामुळे त्यांना आदिवासी जातीचा लाभ मिळण्याचा प्रश्नच नाही.
- आत्माराम धाबे, आदिवासी प्रकल्प अधिकारी, कळमनुरी.