जालना -
वेळ : बुधवारी दुपारी १२
स्थळ : जालना शहरातील
एम. एस. जैन हायस्कूल
एरवी प्रार्थना सुरू होण्यापूर्वी १०-१५ मिनिटांच्या वेळेत मैदानावर मुलांची मनसोक्त हुल्लडबाजी सुरू असते. बुधवारचे चित्र मात्र काहीसे वेगळे होते. मैदानावर उड्या मारणारी मुले कमीच होती, बहुतांश मुले-मुली पाच-सहाच्या गटांनी एकत्र येऊन पाकमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारासंदर्भात बोलत होती. ज्यांना शाळेत येईपर्यंत या घटनेबाबत माहीत नव्हते ते
आपल्या मित्र-मैत्रिणींकडून याबाबत प्रश्न विचारून माहिती घेत होते.
पाकमध्ये अतिरेक्यांनी शाळेत घुसून भ्याड हल्ला केला. या घटनेने जगभरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे. शाळेवर झालेला दहशतवादी हल्ला असल्याने बुधवारी शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये याच हल्ल्याची चर्चा सुरू होती. एरवी एखादी बातमी वाचली तरी त्याबाबत मित्रांसोबत चर्चा न करणारे विद्यार्थी या घटनेबाबत गंभीरपणे बोलत होते. आपल्या आजूबाजूला घडणा-या घटनांबाबत विद्यार्थी किती संवेदनशील आहेत याचाही प्रत्यय अनेक शिक्षकांना आला. अनेक शाळांनी प्रार्थनेच्या वेळी होणा-या शालेय परिपाठात या घटनेसंदर्भात विद्यार्थांना माहिती दिली. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
-एम. एस. जैन हायस्कूलमध्ये दुपारी १२.१७ वाजता प्रार्थनेच्या वेळी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून विद्यार्थ्यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. काही विद्यार्थ्यांनी वर्गात गेल्यानंतर तोंडावर काळे कापड बांधून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.
-मेणबत्ती पेटवून मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेने अनेक शिक्षकांचे डोळे पाणावले, तर मैदानावर उड्या मारताना रागावणारे वॉचमन काका स्तब्ध उभे राहून हे दृश्य पाहत होते.
खूप भीती वाटली
यासंदर्भातील बातम्या ऐकल्यानंतर खूप भीती वाटली. आपल्याकडे शाळेत असे हल्ले होत नाहीत म्हणून शाळेत यायला भीती वाटत नाही; परंतु पाकिस्तानसारखा प्रकार पुन्हा होऊ नये.
गौरी पांडुरंग मसारे, विद्यार्थिनी
जखमी बरे व्हावेत
मुलांना थोडेसे खरचटले, तरी आईला दु:ख होते. पेशावरमध्ये तर अतिरेक्यांनी मुलांच्या डोळ्यात गोळ्या मारल्या. तीसुद्धा आमच्यासारखीच मुले होती. जखमी विद्यार्थी बरे व्हावेत, अशी प्रार्थना करते.
यशोदा घोगरे, विद्यार्थिनी
अतिरेक्यांना संपवा
आपल्या देशात पाकिस्तानचे सैनिक घुसतात, तेव्हा खूप राग येतो. आता त्यांच्याच देशात अतिरेक्यांनी मुलांना ठार मारले. ही बातमी वाचून दु:ख झाले. सर्व अतिरेक्यांना संपवून टाकावे, असे मला नेहमी वाटते.
अभिजित कळकुंबे, विद्यार्थी
संवेदनशील
या घटनेबाबत विद्यार्थी खूपच संवेदनशील दिसले. अनेक विद्यार्थ्यांनी या घटनेबाबत इत्थंभूत माहिती घेतली होती. अशा घटना योग्य नाहीत. आम्ही त्याचा निषेध केला.
एस. एम. वानगोता, मुख्याध्यापक, एम. एस. जैन हायस्कूल, जालना.