आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गुणांनी हुकले होते मेडिकल, आता बनले जिल्हाधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - बारावीला केवळ दोन गुण कमी पडले नि मेडिकल प्रवेशाची अर्थात डॉक्टर होण्याची संधी हुकली. मात्र मनाशी खूणगाठ बांधली अन्  याच मुलाने आज आयएएस होण्याचा बहुमान  मिळवला. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांसमोर त्याने नवा आदर्श निर्माण केला आहे.  
 
राज्य शासकीय संवर्गातील १२ अधिकाऱ्यांना आयएएसपदी बढती देण्यात आली आहे. त्यात पिशोरचे भूमिपुत्र कैलास विष्णू जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्या यशामुळे केवळ कुटुंबच नव्हे, तर घाटमाथ्यासह पिशोर आणि कन्नड तालुक्याचे नाव मोठे करणाऱ्या जाधवांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परिस्थितीवर मात करून त्यांनी मिळविलेले यश आजच्या पिढीसमोर आदर्शवतच आहे.
 
ज्या काळात टीव्ही-मोबाइलही नव्हते, प्रसारमाध्यमेही तोकडीच होती त्या काळात ग्रामीण भागात अन् तेही जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक व गावातीलच महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर भविष्यात पुढे कोणते शिक्षण असते याचीही धड  माहिती नसताना उच्च माध्यमिक अर्थात अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी औरंगाबादेत देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

१९८१ मध्ये ग्रामीण भागात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. केवळ २ गुणांनी मेडिकल प्रवेश हुकला. त्यामुळे पिशोरच्या  कैलास विष्णू जाधव या मुलाचे  डॉक्टर होण्याचे स्वप्न हुकले. मग हुरहुर वाढली. अशिक्षित वडिलांनी मुलाच्या मनातील घालमेल ओळखली. पाठीवर शाबासकीची थाप दिली नि कोणत्याही प्रकारची शिकवणी नसताना मुलाने मिळवलेल्या गुणांची दखल घेत पुढील शिक्षण घेण्याची अनुमती देत मोठा अधिकारी हो, अशी उभारी दिली. त्यानंतर कैलास जाधव यांनी परभणी येथील कृषी विद्यापिठात बीएस्सी अॅग्रीला प्रवेश घेतला. एमएस्सी अॅग्रीच्या प्रथम वर्षात असतानाच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली नि पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाने  पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाले.
 
मात्र त्यांनी नोकरी न स्वीकारता आपले शिक्षण पूर्ण केले. पुढच्या वेळी फॉरेस्ट रेंजर ऑफिसरची परीक्षा महाराष्ट्रातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तेथेही न स्थिरावता त्यांनी फूड इन्स्पेक्टरची परीक्षा उत्तीर्ण केली. चौथ्या वेळी त्यांनी अॅग्रीच्या परीक्षेतही यश संपादन केले. कृषी अधिकारी बनले. १९९२ मध्ये थेट उपजिल्हाधिकारीपदी मजल मारली.   
 
कामातील प्रामाणिकपणा, सर्वसामान्यांच्या परिस्थितीचे भान आणि समस्यांची जाण, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि कर्मावर असलेल्या विश्वासाने त्यांनी विविध पदे भूषवली. ग्रामीण भागाची असलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. बारावीला केवळ दोन गुणांनी मेडिकलचा प्रवेश हुकला त्यामुळे डॉक्टर होता आले नाही याची रुखरुख त्यांच्या मनात कायम होती. मात्र नंतर ध्येय ठेवून केलेले प्रयत्न, जिद्द आणि चिकाटीने त्यांनी विविध क्षेत्रांत यश मिळविले.  २०१७ मध्ये राज्य शासकीय संवर्गातील १२ अधिकाऱ्यांना आयएएस म्हणून बढती मिळाली. यात घाटमाथ्यावरील पिशोर येथील कैलास विष्णू जाधव यांचा समावेश आहे.  त्यांच्या यशामुळे  पिशोरसह घाटमाथा आणि कन्नड तालुक्याची मान उंचावली आहे.

स्पर्धा परीक्षेकडे वळावे
न्यूनगंड न बाळगता परीक्षेस सामोरे जावे. उचित ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी आवश्यक आहे. पूर्वी प्रसारमाध्यमे तोकडी होती. दहावीनंतर काय? याबाबतही काहीच माहीत नसायचे. आता काळ बदलला आहे. त्यामुळे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहे. तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे.
- कैलास विष्णू जाधव, आयएएस
बातम्या आणखी आहेत...