Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Sucide : Social Justice Minister Son in law Not Caught Yet

आत्महत्या: सामाजिक मंत्र्यांचे जावई असलेले आरोपी अद्यापही फरार

प्रतिनिधी | Update - Sep 12, 2013, 07:27 AM IST

शाळेतील प्रवेश निर्गम उतार्‍यावरील जातीच्या रकान्यात ‘कोळी’ शब्दापुढे ‘महादेव’ शब्दाचा उल्लेख करून औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील 21 माजी विद्यार्थ्यांची जात बदलण्यात आली होती.

 • Sucide : Social Justice Minister Son in law Not Caught Yet

  हिंगोली - शाळेतील प्रवेश निर्गम उतार्‍यावरील जातीच्या रकान्यात ‘कोळी’ शब्दापुढे ‘महादेव’ शब्दाचा उल्लेख करून औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील 21 माजी विद्यार्थ्यांची जात बदलण्यात आली होती. या प्रकारानंतर झालेल्या कोळी समाजातील तरुणाच्या आत्महत्येस जबाबदार असलेले सामाजिक न्यायमंत्र्यांचे जावई तथा आदिवासी संघाचे अध्यक्ष डॉ. टारफे हे मात्र पोलिसांच्या लेखी अद्याप फरार आहेत. दरम्यान, पोलिस आणि कळमनुरीचे आमदार सातव यांच्या आशीर्वादाने ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.

  ब्राह्मणवाडा येथील कोळी समाजातील राजू विभुते या तरुणाने 15 दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आदिवासी युवक कल्याण संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष टारफे यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कोळी आदिवासी संघटनेने निषेध सभा घेऊनही अद्याप एकाही आरोपीला अटक झाली नाही. उलट आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेले सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे यांचे जावई डॉ. संतोष टारफे मात्र सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये खुलेआम फिरताना दिसत आहेत. 9 सप्टेंबर रोजी सिद्धेश्वर येथे झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कळमनुरीचे आमदार राजीव सातव यांच्यासह त्यांनी हजेरी लावली होती. यावरही गंभीर बाब ग्रामीणच्या पोलिस उपअधीक्षकांनी तर आरोपींविरुद्ध अद्याप सबळ पुरावा मिळाला नसल्याने त्यांना अटक केली नसल्याचे सांगून हात वर केले आहेत.
  काय आहे प्रकरण?

  ब्राह्मणवाडा येथील शाळेतील निर्गम उतार्‍यातील ‘कोळी’ ऐवजी महादेव कोळी (आदिवासी) असा उल्लेख हस्ताक्षराने खाडाखोड करून करण्यात आला होता. डॉ. टारफेंच्या आंदोलनामुळे या प्रकरणी 23 सप्टेंबर रोजी सरकारी कागदपत्रांमध्ये खाडाखोड केल्याबद्दल अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यानंतर राजू मुंजाजी विभुते याने 27 सप्टेंबरला आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते आणि कृष्णा पिंपरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. महादेव कोळी जातीच्या दाखल्यावर नोकरीस लागलेल्या वडिलांची नोकरी जाणार या भीतीपोटी राजूने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.


  आरोपी सिद्धेश्वर येथील कार्यक्रमात
  औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याबद्दल घेण्यात आलेल्या कार्यक्रमात या प्रकरणातील एक आरोपी डॉ. संतोष टारफे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार राजीव सातव यांच्यासह पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


  खाडाखोड कुणी केली?
  ब्राह्मणवाडा येथील 21 माजी विद्यार्थ्यांच्या निर्गम उतार्‍यातील जात रकान्यात हा बदल झाला होता. यापैकी 4 जण मृत झाले आहेत. उर्वरित 17 पैकी तिघे सरकारी नोकरीत आहेत. हयात असलेल्यांच्या हस्ताक्षराचे नमुने पोलिस घेत आहेत. अद्याप तरी पोलिसांना या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाला नाही. गणपतीचा बंदोबस्त संपल्यानंतरच तपास केला जाईल, असे तपासाधिकारी पीआय विजय जोंधळे यांनी सांगितले.

Trending