आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार, प्रशासनातील अपारदर्शकतेविरुद्ध संग्रामचा लढा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - प्रशासनाबद्दलची लोकांच्या मनातील अढी दूर करण्यात व प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्याचे सामर्थ्य संगणकीकृत ग्रामपंचायत उपक्रमात अर्थात संग्राममध्ये असून भ्रष्टाचार व प्रशासनातील अपारदर्शकतेवर हा लढा असल्याचे मत प्रधान सचिव सुधीर ठाकरे यांनी व्यक्त केले. अर्थातच भ्रष्टाचार व प्रशासनात अपारदर्शकता असल्याचे मान्य करत त्यात बदल होण्यासाठी भक्कम पर्याय म्हणून संग्राम आहे हे पुढे आले आहे.
या निमित्ताने जालना जिल्ह्यात सुरू झालेली 351 ग्रामसेवा केंद्रे आणि अडीच हजार पाणंद रस्त्यांचे रुंदीकरण हीसुद्धा सचिवांना एक भेटच ठरली व अवघ्या सहा महिन्यांत झालेली ही कामे गतिमान कामकाजाचे उदाहरण ठरले. सचिव दौ-याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने चांगलीच तयारी करून ठेवली होती. 15 डिसेंबरपासूनच तालुकानिहाय 10 ग्रामसेवा केंद्रे सुरू करण्यात आले होते. पुढे जानेवारी महिना उलटताच हा आकडा तीनशेच्या घरात पोहोचला अन् सचिव दौ-यात 381 ग्रामसेवा केंद्र सुरू झाल्याचा अहवालच जिल्हाधिका-यांनी सचिवांसमोर मांडला. विशेष म्हणजे कडेगाव येथील अनिल निंबाळकर यांना ग्रामसेवा केंद्रातून सातबारा देण्यात आला.
जूनपासून डिसेंबरअखेर जिल्ह्यात 2 हजार किमी अतिक्रमित पाणंद रस्ते लोकसहभागातून मोकळे करण्याचे उद्दिष्ट होते. लोकसहभागातून रस्ता मोकळा करून दिल्यास महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रतिकिलोमीटर 18 लाख रुपये खर्चून खडीकरणाचे काम करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते. ठरविल्याप्रमाणे रस्ता रुंदीकरण पूर्ण होऊन खडीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे पाणंद रस्ता रुंदीकरणाची जणू गावक-यांमध्ये स्पर्धाच लागली, परिणामी जिल्ह्यात अडीच हजार किमी रस्ते मोकळे झाले आहे. याचा फायदा लाखो शेतक-यांना होणार असून वर्षभर शेतकरी बिनदिक्कतपणे बी-बियाणे, शेतमालाची ने-आण करू शकतील. जिल्हा परिषदेतील संग्राम कक्षाचे उद्घाटन केल्यानंतर ठाकरे यांनी बांधकाम विभाग पाहून इमारतीच्या दुस-या मजल्यावरून सर्वच विभागांचा आढावा घेतला. तळमजल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या दालनात प्रवेश करताच त्यांना दालन भावले. बांबूपासून केलेली अंतर्गत सजावट पाहून त्यांनी कारागिराची वाहवा केली. पुढे कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळेत सुरुवातीलाच शासनाची भूमिका पारदर्शक व गतिमान प्रशासन करण्याची असून यासाठी सर्वांचा हातभार लागावा असे म्हटले. दरम्यान, अमेरिकेच्या चांद्र मोहिमेचा दाखला देत तेथील सफाई कामगारसुद्धा मोहिमेत सहभागी असल्याचे सांगत असल्याचे ठाकरे म्हटले. ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करून 5 लाखांपेक्षा अधिक रकमेची कामे ई-टेंडरिंग पद्धतीने करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. येथील सर्वच अधिकार सरपंचांना असतात असे सांगून ग्रामविकासात त्यांनी पुढाकार घ्यावा. दरम्यान, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सध्या 381 ग्रामसेवा केंद्रे आॅफलाइन आहेत मात्र, 1 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवा केंद्र सुरू होऊन आॅनलाइन होतील असे आश्वासन दिले. पुढे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांनी प्रिया सॉफ्टवेअरमध्ये फेब्रुवारी अखेर एन्ट्री करण्यात जालना यावर्षी प्रथम राहील असे सांगितले. यावरून जिल्हा प्रशासनातील विकासाची स्पर्धा लक्षात आली.